प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक ‘सखी मतदान केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:36 AM2019-04-02T10:36:09+5:302019-04-02T10:37:00+5:30

महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदार संघात किमान एक मतदान केंद्र हे संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांचे असावे, यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे.

In each Vidhan Sabha constituency, a 'Sakhi Polling Center' | प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक ‘सखी मतदान केंद्र’

प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक ‘सखी मतदान केंद्र’

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाचा पुढाकार केंद्रातील सर्व कर्मचारी राहणार महिला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदार संघात किमान एक मतदान केंद्र हे संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांचे असावे, यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीतही प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक सखी मतदान केंद्र राहणार आहे. या केंद्रात पोलिसांपासून तर निवडणुकीच्या कामासाठी तौनत असलेले अधिकारी,कर्मचारी सर्वच जण महिला असतील, हे विशेष.
लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार असून, याला ‘सखी मतदान केंद्र’ असे म्हटले जाणार आहे. या महिला मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. नागपुरात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. यामध्ये दक्षिण-पश्चिम, दक्षिण, पूर्व, पश्चिम, उत्तर, मध्य याचा समावेश आहे. या सहाही विधानसभा मतदार संघात स्त्री मतदारांची संख्या ही १० लाख ४५ हजारावर आहे. तर रामटेकमध्ये कामठी, उमरेड, काटोल, हिंगणा, रामटेक व सावनेर या मतदार संघांचा समावेश आहे. येथे महिला मतदारांची संख्या ९ लाख १२ हजारावर आहे. या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये एक सखी मतदान केंद्र राहणार आहे. ‘सखी मतदान केंद्र’ अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह येथील साफसफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक ठरणार आहे. ‘सखी मतदार केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. प्रत्येक मतदार संघातून एकाच मतदान केंद्राची निवड होईल. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन नजीकच्या केंद्राची तसेच ज्या मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: In each Vidhan Sabha constituency, a 'Sakhi Polling Center'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.