ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:18 AM2018-01-28T00:18:56+5:302018-01-28T00:25:50+5:30

काही व्यक्तींच्या जीवनाची ओळख अशी असते की जणू ईश्वराने नेमक्या त्याच कामासाठी त्यांना पृथ्वीवर पाठविले असावे असे वाटते. भजनसम्राट म्हणून नावलौकिक असलेले पं. अनुप जलोटा यांच्याबाबतीत असेच म्हणावे लागेल. ईश्वरानेच स्वर देऊन त्यांना भजन गाण्यासाठीच पाठविले की काय, असा भास व्हावा असा त्यांचा अंदाज. भावविभोर करणारा आवाज, कधी थांबत तर कधी लांब होणारे त्यांच्या सुरांचे आलाप आणि ऐकणाऱ्या  श्रोत्यांना थेट ईश्वरभक्तीत जोडणारा त्यांचा स्वर. त्यांच्या सुरांच्या जादूमुळे भक्तिरसात तल्लीन झाल्याचा अनुभव शनिवारीही नागपूरकरांना आला.

Eaisi lagi lagan Mira ho gai magan .... | ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन...

ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन...

googlenewsNext
ठळक मुद्देजलोटा यांच्या भक्तिरसात श्रोते तल्लीन : साई पादुका आगमन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही व्यक्तींच्या जीवनाची ओळख अशी असते की जणू ईश्वराने नेमक्या त्याच कामासाठी त्यांना पृथ्वीवर पाठविले असावे असे वाटते. भजनसम्राट म्हणून नावलौकिक असलेले पं. अनुप जलोटा यांच्याबाबतीत असेच म्हणावे लागेल. ईश्वरानेच स्वर देऊन त्यांना भजन गाण्यासाठीच पाठविले की काय, असा भास व्हावा असा त्यांचा अंदाज. भावविभोर करणारा आवाज, कधी थांबत तर कधी लांब होणारे त्यांच्या सुरांचे आलाप आणि ऐकणाऱ्या  श्रोत्यांना थेट ईश्वरभक्तीत जोडणारा त्यांचा स्वर. त्यांच्या सुरांच्या जादूमुळे भक्तिरसात तल्लीन झाल्याचा अनुभव शनिवारीही नागपूरकरांना आला.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी तसेच श्री सदगुरु  साई चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर, श्री साई समाधी शताब्दी महोत्सव समिती विदर्भ आणि साईभक्त साईसेवक परिवार विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबा चर्म चरण पादुका आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत चिटणीस पार्कवर ‘गजर साईनामाचा’ हा तीन दिवसीय भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. या महोत्सवात शनिवारी भजन गायक पद््मश्री पं. अनुप जलोटा यांनी आपल्या सादरीकरणाने रंग भरले. श्रोत्यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. रात्री ८ वाजता त्यांचे आगमन झाले. त्यांनी येताच आधी साई पादुकांचे दर्शन घेतले व त्यानंतर मंच सांभाळला. आपल्या चिरपरिचित अंदाजात ‘है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभुचरण मे वंदना किया करे...’ या शायरीने सुरुवात करीत त्यांनी ‘जय श्री वीर बाबा, जय श्री वीर साई...’ ने आलाप दिला. मात्र लगेच त्यांनी ‘ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन...’ गात श्रोत्यांना आपल्याशी जोडले. हे भजन म्हणजे अनुप जलोटा यांची ओळखच होय. त्यामुळे त्यांचे गाणे सुरू होताच श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रतिसाद दिला. पुढे त्यांनी ‘बचपन के शिवम, कृष्ण दामोदरम, राम नारायणम...’ सादर केले. अनुप जलोटा यांच्या चित्रपट गायकीला ४० वर्षांपूर्वी ज्या ‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटातून सुरुवात झाली, त्यातील ‘साईनाथ तेरे हजारो हाथ...’ गायला सुरू करताच श्रोत्यांच्या भावनांना वाट मोकळी झाली व प्रत्येकजण त्यांच्यासोबत गाऊ लागले.
भजनांची ही सुरेल मैफिलीचा उत्तरोत्तर रंग चढत गेला.
अनुप जलोटा यांनी ‘राम नाम की लूट है, लूट सके तो लूट..., साईबाबा बोलो..., पायो जी मैने राम रतन धन पायो..., जहां जहां मै जाता साई, गीत तुम्हारे गाता..., इतना तु करना स्वामी, जब प्राण तनसे निकले...’ अशी एकाहून एक सरस भजने त्यांनी सादर केली. त्यांच्या गायनाची प्रत्येक शैली श्रोत्यांचा मनाचा ठाव घेणारी होती. त्यांना सहगायिका नीता शाजी अग्रवाल यांच्यासह तबल्यावर देवेंद्र भारती, गिटारव धीरेंद्र व व्हायोलिनवर एम. राशीद यांनी सुरेल साथसंगत केली. यादरम्यान पं. जलोटा यांची सरगम व राशीद यांच्या व्हायोलिनची जुगलबंदी श्रोत्यांना उत्साहित करून गेली.
कार्यक्रमापूर्वी आयोजन समितीचे संयोजक पंकज महाजन यांनी अनुप जलोटा यांचे व इतर कलावंतांचे स्वागत केले. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साईपादुकांचे दर्शन घेतले. यासोबतच आमदार कृष्णा खोपडे, माजी खासदार दत्ता मेघे, वीरबजरंगी सेवा संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत आगलावे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, राजीव जयस्वाल, बंडू राऊत, साई चित्रकार सुनील शेगावकर उद्योजक प्रशांत शेंडे यांनी भेट दिली. आयोजनात प्रदीप साबळे, विवेक अवसरे, प्रमोद कोरमकर, राज कोरमकर, नरेंद्र धनविजय, पंकज झरबडे, मोहन चौहान, भूषण परसोडकर, आशिष चिरकुटे, अनुपम बल्की, अमोल बैस, अमित गोंडाणे, विजय भोयर, सचिन खवले, जिगनेश साबळे, भूपेन दाते, आशिष खिरेकर आदींचा सक्रिय सहभाग आहे.
लाखो भाविकांनी घेतले दर्शन
साई पादुका आगमन सोहळा हा नागपूर व विदर्भातील साईभक्तांसाठी अविस्मरणीय क्षण ठरत आहे. २५ ला साईबाबांच्या चरण पादुकांचे आगमन झाले तेव्हापासून पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे. शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी पादुका दर्शनासाठी चिटणीस पार्क वर रीघ लागली होती. साईनामाचा गजर करीत भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी पोहचत होते. ही गर्दी रात्री उशिरापर्यंत होती. दिवसभरात लाखो भाविकांनी साईपादुकांचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Eaisi lagi lagan Mira ho gai magan ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.