कुत्र्यांच्या नसबंदीसाठी आधीचा खर्च व्यर्थ, आता पुन्हा १६.७३ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:10 AM2021-09-14T04:10:44+5:302021-09-14T04:10:44+5:30

श्वानांची दहशत : भाग ६ गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील कुत्र्यांची संख्या कायमस्वरूपी मर्यादित राखण्यासाठी महानगरपालिका ...

Earlier expenditure for neutering of dogs wasted, now again proposal of Rs 16.73 crore | कुत्र्यांच्या नसबंदीसाठी आधीचा खर्च व्यर्थ, आता पुन्हा १६.७३ कोटींचा प्रस्ताव

कुत्र्यांच्या नसबंदीसाठी आधीचा खर्च व्यर्थ, आता पुन्हा १६.७३ कोटींचा प्रस्ताव

Next

श्वानांची दहशत : भाग ६

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील कुत्र्यांची संख्या कायमस्वरूपी मर्यादित राखण्यासाठी महानगरपालिका आणि पशुसंवर्धन विभागाने मिळून भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव तयार केला आहे. १६ कोटी ७३ लाख २८ हजार रुपयांचा हा प्रस्ताव आहे. नागपूर शहरातच नव्हे, तर लगतच्या वाडी, कामठी आणि हिंगणा नगरपालिकेच्या हद्दीतील, कुत्र्यांवरही एकाच वेळी नसबंदी करण्याची ही योजना आहे.

या चारही ठिकाणी मिळून १ लाख ४ हजार ५८० कुत्र्यांची संख्या गृहीत असून, प्रत्येक कुत्र्यामागे १,६०० रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. ऑपरेशन व लसीकरणासाठी १,४०० रुपये आणि कुत्र्यांना पकडणे व पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडणे यासाठी प्रत्येकी २०० असा खर्च गृहीत धरला आहे.

ही योजना पशुसंवर्धन विभागाच्या पुढाकाराने राबविणार आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या प्रादेशिक सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. त्यात उपायुक्त पशुसंवर्धन, सहआयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी आणि मनपा व नगर पालिकांचे पशुवैद्यकीय अधिकारी सदस्य असतील.

या समितीने तीन महिन्यांपूर्वीच शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी येणारा निधी पशुसंवर्धन विभागाकडे येईल. नंतर तो महानगरपालिका व नगरपालिकांना दिला जाईल. राष्ट्रीय स्तरावरील एनजीओ नियुक्त करून त्यांच्याकडून ही मोहीम राबविण्याचे प्रस्तावित आहे.

...

असा आहे नसबंदीचा प्रस्ताव

पालिका : कुत्र्यांची संख्या : संभाव्य खर्च

नागपूर मनपा : ९०,००० : १४ कोटी ४० लाख

वाडी न.पा. : १,६२० : २५ लाख ९२ हजार

कामठी न.पा. : ४,०५० : ६४ लाख ८० हजार

हिंगणा न.पा. : ८,९१० : १ कोटी ४२ लाख ५६ हजार

एकूण : १,०४,५८० : १६ कोटी ७३ लाख २८ हजार

...

टप्प्याटप्प्याने नसबंदीचा खर्च व्यर्थ

महानगरपालिकेने २००६ ते २०१९ या काळात दरवर्षी कुत्र्यांची नसबंदी केली. १४ वर्षे नसबंदीची प्रक्रिया राबवूनही कुत्र्यांची संख्या दरवर्षी वाढतेच आहे. या अपयशाबद्दल विचारणा केली असता डॉ. गजेंद्र महल्ले म्हणाले, टप्प्याटप्प्याने नसबंदी करून काही फायदा नाही. खर्च व्यर्थ आहे. नर, मादी असा विचार न करता एकाच वेळी सर्व कुत्र्यांवर नसबंदी केली तरच हे शक्य आहे.

....

Web Title: Earlier expenditure for neutering of dogs wasted, now again proposal of Rs 16.73 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.