देशासाठी पदके मिळवली, आता विकताे चहा-पाेहे; छत्रपती पुरस्कारप्राप्त दिव्यांग खेळाडूची नोकरीसाठी वणवण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 07:23 AM2023-08-09T07:23:59+5:302023-08-09T07:24:36+5:30
क्रीडा आयुक्तालयातून २०१८ मध्ये नोकरीसंदर्भात खेळाडूंची यादी प्रसिद्ध झाली. कागदपत्रांची पडताळणी झाली; पण पुढे त्यावर काहीच निर्णय झाला नाही.
- राजेश टिकले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्येत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीप गवई या दिव्यांग खेळाडूला शासनाने उपेक्षित ठेवले आहे. शासकीय नोकरीसाठी धडपड करताना निराशा आल्याने कुटुंबाच्या पोषणासाठी अखेर त्याने चहा-पोह्यांची गाडी सुरू केली आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या संदीपने चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रीय आणि राज्य स्तरांवर त्याने १८ मेडल पटकाविली आहेत. संदीप एका पायाने दिव्यांग आहे. या पदकांच्या भरोशावर शासकीय नोकरी मिळेल, अशी त्याला अपेक्षा होती; पण तीही फोल ठरली आहे.
आश्वासन दिले, पण...
क्रीडा आयुक्तालयातून २०१८ मध्ये नोकरीसंदर्भात खेळाडूंची यादी प्रसिद्ध झाली. कागदपत्रांची पडताळणी झाली; पण पुढे त्यावर काहीच निर्णय झाला नाही. संदीपने नोकरी मिळावी म्हणून मंत्रालयाच्या चकरा मारल्या. आमदार बच्चू कडू यांना भेटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत कैफियत पोहोचविली. त्यांनीही दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेतला; पण ती बैठकच झाली नाही.
उपजीविकेसाठी नाइलाजाने चहा-पोह्यांची गाडी लावली आहे. त्यातून कुटुंबाची गुजराण करीत आहे. दु:ख याचे वाटतेय की, शासन दिव्यांगांच्या बाबतीत उदासीन आहे. नवे खेळाडू माझी व्यथा बघून खेळापासून परावृत्त होत आहेत. - संदीप गवई, शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित