विदेशी फेसबुक फ्रेण्डच्या नादात गमाविली आयुष्याची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 12:13 AM2021-08-01T00:13:58+5:302021-08-01T00:14:30+5:30
Facebook fraud यूकेतून गोल्ड डायमंड ज्वेलरी आणि मेडिसिन पाठविल्याची थाप मारून कथित विदेशी फेसबुक फ्रेण्ड आणि त्याच्या साथीदाराने एका वृद्धेची आयुष्यभराची कमाई हडपली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - यूकेतून गोल्ड डायमंड ज्वेलरी आणि मेडिसिन पाठविल्याची थाप मारून कथित विदेशी फेसबुक फ्रेण्ड आणि त्याच्या साथीदाराने एका वृद्धेची आयुष्यभराची कमाई हडपली. ५ ते १९ जुलैदरम्यान घडलेल्या या फसवणुकीची तक्रार मिळाल्यानंतर सोनेगाव पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
वर्धा मार्गावरील मेहेर कॉलनीत मंगला धनराज फुसे (वय ६२) राहतात. त्या आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या निवृत्त परिचारिका आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना ऑलेक्स जो नामक व्यक्तीने फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली. मंगला फुसे यांनी ती ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यांची चॅटिंग सुरू झाली. आपण यूकेत राहतो. डॉक्टर आहोत, अशी थाप त्याने मारली. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे व्हॉट्सॲप नंबर घेतले. काही दिवसांनंतर कथित जो याने फुसे यांना आपण आईसह भारतात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने फुसे यांना गोल्ड डायमंड ज्वेलरी आणि मेडिसिन बॉक्स पाठविल्याची थाप मारली. त्यानुसार, ५ जुलैला नम्रता शर्मा नामक महिलेचा फुसे यांना फोन आला. तुमचे यूकेवरून पार्सल आले आहे. ६ लाख १८ हजार रुपये किमतीचे हे पार्सल सोडवण्यासाठी ३७ हजारांची कस्टम ड्युटी भरावी लागेल, असे सांगितले. पार्सल सोडवले नाही तर ५० हजारांची पेनल्टी भरावी लागेल, असेही म्हटले. त्यामुळे फुसे यांनी २० हजार रुपये आधी जमा केले. त्यानंतर, वेळोवेळी आरोपी जो तसेच नम्रताने फोन, मेसेज करून वेगवेगळी कारणे सांगत फुसे यांना रक्कम जमा करण्यास बाध्य केले.
गिफ्ट पार्सल नको, रक्कम परत करा
१९ जुलैपर्यंत तब्बल २२ लाख, ९५ हजार रुपये जमा करूनही आरोपींकडून पैशांची मागणी सुरूच होती. त्यामुळे फुसे यांनी पार्सल नको, माझी रक्कम मला परत करा, असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे फुसे यांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चाैकशी केल्यानंतर शुक्रवारी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.