पृथ्वी विज्ञान सचिव हाजीर हो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:41 AM2018-07-24T01:41:38+5:302018-07-24T01:41:55+5:30
हायकोर्टाचा आदेश; विदेशातून परतल्यावर पासपोर्ट जप्त होईल
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका अवमानना प्रकरणामध्ये केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन, हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. लक्ष्मणसिंग राठोड व उप-महासंचालक डॉ. पी. के. नंदनकर यांना येत्या ३० जुलै रोजी न्यायालयात व्यक्तिश: हजर होण्याचा आदेश दिला. तसेच, पुढील तारखेला या तिन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालय अवमाननेचे दोषारोप का निश्चित करण्यात येऊ नये यावर स्पष्टीकरण सादर करावे, असे सांगितले.
न्यायालयाने यापूर्वीच्या तारखेलाच या तिन्ही अधिकाºयांविरुद्ध समन्स जारी करून त्यांना २३ जुलै रोजी न्यायालयात बोलावले होते. परंतु, पृथ्वी विज्ञान सचिव जिनिव्हा येथे असल्यामुळे ते न्यायालयात उपस्थित होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयात उपस्थित होण्यापासून सुट देण्याची विनंती करण्यात आली. परंतु, न्यायालयाने ही विनंती अमान्य करून तिन्ही अधिकाºयांना ३० जुलै रोजी न्यायालयात हजर होण्यास सांगितले. तसेच, पृथ्वी विज्ञान सचिव भारतात परत आल्यानंतर त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा असे निर्देश दिलेत. प्रादेशिक हवामान विभागामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव नोकºया मिळविणाºया कर्मचाºयांच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली नसल्यामुळे दि आॅर्गनायझेशन फॉर दि राईटस् आॅफ दि ट्रायबल्सने उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.