निसर्गचक्रातील मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी विनाशाच्या टप्प्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 11:08 AM2021-08-12T11:08:00+5:302021-08-12T11:08:32+5:30
Nagpur News ग्लोबल वॉर्मिंग किंवा तापमानवाढ हा नुसता भ्रम असल्याचा दावा खोडून काढताना आयपीसीसीच्या सहाव्या अहवालात विनाशाच्या वाटेवरील जीवसृष्टीचे अनेक दाखले देण्यात आले आहेत.
श्रीमंत माने/निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पृथ्वीवरील जीवसृष्टी व हजारो वर्षांच्या परिश्रमातून निर्माण झालेले सुंदर जग माणसांच्याच वागण्यामुळे, निसर्गचक्रातील हस्तक्षेपामुळे विनाशाच्या टप्प्यावर पोहोचल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या संस्थेने दिला आहे. ग्लोबल वॉर्मिंग किंवा तापमानवाढ हा नुसता भ्रम असल्याचा दावा खोडून काढताना आयपीसीसीच्या सहाव्या अहवालात विनाशाच्या वाटेवरील जीवसृष्टीचे अनेक दाखले देण्यात आले आहेत.
जगभरातील शेकडो अभ्यासकांच्या हवामानातील बदलाविषयीच्या चौदा हजार अभ्यासांचा अंतर्भाव सोमवारी जारी केलेल्या आयपीसीसीच्या या सहाव्या अहवालात आहे. आधीचा पाचवा अहवाल २०१४ मध्ये आला होता व त्यातील धोक्यांच्या इशाऱ्यांचा विचार करूनच २०१५ मध्ये पॅरिस करार करण्यात आला होता.
ताज्या अहवालानुसार, दोन सहस्त्रकांमध्ये पृथ्वीचे तापमान अवघ्या अर्धा डिग्रीने वाढले तर औद्योगिक क्रांतीनंतर १८५० ते २००० या दीडशे वर्षांतच तापमानात दीड अंशाने वाढ झाली. औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या वातावरणाशी तुलना करता सध्या पृथ्वीचे तापमान १.१ अंश सेल्सिअसने वाढले आहे. दीड अंशाचा टप्पा २०५० मध्ये ओलांडला जाईल, अशी भीती होती. प्रत्यक्षात हरितवायूंचे उत्सर्जन व त्यातून ओझोन थराची चाळणी रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नसल्याने दीड अंश सेल्सिअसचा उंबरठा दहा-पंधरा वर्षे आधीच, २०४० मध्ये किंवा नेमकेपणाने २०३७ मध्येच ओलांडण्याची भीती आयपीसीसीने व्यक्त केली आहे. ही तापमानवाढ भयंकर परिणाम घडवील व दुरुस्तीची अजिबात संधी माणसांच्या हाती राहणार नाही, असे बजावण्यात आले आहे.
कोण म्हणते ग्लोबल वॉर्मिंग हे खूळ आहे? हे घ्या पुरावे...
* वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण गेल्या वीस लाख वर्षांमध्ये सर्वाधिक पातळीवर
* गेल्या दोन हजार वर्षांमधील हिमशिखरे वितळण्याचा वेग गती सर्वाधिक
* एकविसाव्या शतकातील दुसरे म्हणजे २०२०ला संपलेले दशक गेल्या तब्बल सव्वा लाख वर्षांमधील सर्वाधिक उष्ण
* समुद्राची पातळी वाढण्याचा वेग गेल्या तीन हजार वर्षांमध्ये सर्वाधिक
* आर्क्टिक खंडातील बर्फाच्छादन गेल्या हजार वर्षांमध्ये सर्वांत कमी
* यापूर्वीचे हिमयुग संपल्यानंतर महासागराच्या पृष्ठभागाची सर्वाधिक गतीने तापमानवाढ
* महासागराचे आम्लीकरणाचा वेग (ॲसिडीफिकेशन) गेल्या २६ हजार वर्षांमधील सर्वाधिक
* ग्रीनलँड बर्फाच्छादन वितळले तर समुद्राची पातळी तब्बल ७.२ मीटरने वाढेल, तर अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील आईसशीट वितळली तर ही पातळी ३.३ मीटरने वाढेल.