बँकेत सुलभपणे बदलवा २ हजाराच्या नोटा; रांगा नाहीत
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 23, 2023 02:31 PM2023-05-23T14:31:24+5:302023-05-23T14:32:01+5:30
ग्राहकाला भरावी लागते एका फॉर्ममध्ये माहिती : सर्वच बाजारपेठांमध्ये २ हजारांच्या नोटेने होताहेत व्यवहार
नागपूर : रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एक पत्रक जारी करीत दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेत असल्याचे म्हटले होते, पण त्याचवेळी ही नोट चलनात कायम राहील, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरला होता. तो सोमवारी नोटा बदलविता दूर झाला. त्यामुळे सर्वच बँकांमध्ये ग्राहकांच्या रांगा दिसल्या नाहीत.
सदर प्रतिनिधीने दुपारी नंदनवन येथील कॅनरा बँक, गुरुदेवनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, ओमनगर येथील बँक ऑफ बडोदा, सीताबर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडियाची पाहणी केली. या सर्व बँकांमध्ये नोट बदलविणाऱ्या ग्राहकांची छोटी वा मोठी रांगा दिसली नाही. ग्राहक फॉर्म भरून २ हजारांच्या नोटा बदलून घेताना दिसले. याकरिता कुणालाही रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागत नसल्याचे कॅनरा बँकेच्या व्यवस्थापनाने सांगितले. हीच बाब स्टेट बँकेच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केली.
ते म्हणाले, फॉर्मवर नोटा बदलविणाऱ्या ग्राहकाचे नाव, मोबाईल क्रमांक, बँकेत असलेल्या खात्याचा क्रमांक भरून द्यायचा आहे. फॉर्म भरून दिल्यास तातडीने नोटा बदलवून दिल्या जात आहेत. याशिवाय एका बँकेच्या ग्राहकाला दुसऱ्या बँकेत नोटा बदलविता येऊ शकते. ग्राहकांना असे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे बँकेत मोठी रांग वा गर्दी होण्याचा प्रश्नच नाही. शिवाय २ हजाराच्या कितीही नोटा जमा करता येऊ शकतात. सीताबर्डी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सकाळी जवळपास १५ ग्राहक रांगेत होते. त्यांना नोटा बदलवून घेण्यासाठी फार वेळ थांबावे लागले नाही. केवळ फॉर्मच्या आधारे त्यांना २ हजाराच्या नोटा बदलवून दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सर्व बाजारपेठांमध्ये २ हजारांचे चलन सुरू
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर २ हजाराच्या नोटेसंदर्भात लोकांमध्ये तीन दिवस पॅनिक होते. बाजारपेठांमध्ये नोटा चालणार वा नाही, यावर संभ्रम होता. पण आता पेट्रोल पंपासह सर्वच बाजारपेठांमध्ये या नोटांनी व्यवहार सुरळीत झाल्यानंतर पॅनिक दूर झाले. सर्वच बाजारपेठांमधील व्यापारी २ हजाराच्या नोटा स्वीकारत आहेत. या नोटा लोकांकडे फार कमी प्रमाणात असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सराफा बाजारात २ हजारांच्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
ग्राहक काय म्हणतात...
कॅनरा बँकेत २ हजाराच्या नोटा बदलविण्यासाठी आलेले ग्राहक दिलीप वडे म्हणाले, मी निवृत्त शासकीय कर्मचारी आहे. माझे कॅनरा बँकेत खाते नाही. पण नोटा बदलविण्यासाठी या बँकेत आलो आहे. वैयक्तिक माहितीचा फॉर्म भरून दिल्यानंतर कॅशियरने २ हजाराच्या १० नोटा बदलवून दिल्या.