एमपीएससीची पूर्व पुढे ढकलली, विद्यार्थी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:11 AM2021-03-13T04:11:28+5:302021-03-13T04:11:28+5:30
नागपूर : कोरोना संक्रमणाचे कारण देत दोन वर्षांत तब्बल तीनवेळा राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता पुन्हा ...
नागपूर : कोरोना संक्रमणाचे कारण देत दोन वर्षांत तब्बल तीनवेळा राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता पुन्हा चौथ्यांदा ती पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. या निर्णयाविरोधात नागपुरातील विद्यार्थ्यांनी सक्करदरा चौकात गुरुवारी सायंकाळी निदर्शने केली. हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलनाची हाक देण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. एमपीएससीच्या उमेदवारांनादेखील याचा फटका बसला आहे. आतापर्यंत तीन वेळा परीक्षा रद्द झाल्यानंतर आता पुन्हा चवथ्यांंदा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने परिपत्रक काढून जाहीर केले आहे.
नागपुरात हे वृत्त कळताच सुमारे ४०० ते ५०० च्या संख्येतील विद्यार्थ्यांनी सक्करदरा येथील चौकात एकत्र येऊन अकस्मात आंदोलन सुरू केले. सुमारे तासभर ही निदर्शने सुरू होती. नंतर पोलिसांच्या मध्यस्तीने आंदोलन निवळले. एमपीएससीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास उद्याही आंदोलन केले जाईल, सर्वजण रस्त्यावर उतरू, असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
या पूर्वपरीक्षेसाठी सर्व तयारीदेखील पूर्ण झाली होती. उमेदवारांना प्रवेशपत्रदेखील देण्यात आले होते. प्रशासनही तयारीला लागले होते. परीक्षेच्या अवघ्या तीन दिवसांआधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
...
परीक्षा केंद्र : ३८
विद्यार्थी संख्या : १२,५७६
...
तयारी आणि हिरमोड
अनेक विद्यार्थी मागील चार ते पाच वर्षांपासून या परीक्षेची तयारी करीत आहे. अनेक विद्यार्थी बाहेरगावाहून येथे राहून स्टडी रूममधून अभ्यास करीत आहे. यासाठी पालकांना बसलेल्या खर्चाची जाणीव असल्याने आता पुन्हा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहे. तीन वेळा लांबणीवर पडलेली परीक्षा यावेळी नक्की होईल, असा अंदाज होता. मात्र परीक्षेच्या तीन दिवसांआधी ती रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत असल्याने अस्वस्थता पसरली आहे.
रद्द होण्याची चाैथी वेळ
प्रारंभी ही परीक्षा ५ एप्रिल २०२० ला तर संयुक्त पूर्वपरीक्षा ५ मे २०२० रोजी होणार होती. मात्र कोरोनामुळे ती पुढे ढकलून २६ एप्रिल २०२० ला घेण्याचे ठरले. राज्यातील संक्रमणाची परिस्थीती नियंत्रणात नसल्याने नंतर ११ ऑक्टोबरला ठरली. त्यानंतर पुन्हा लांबणीवर पडून १४ मार्च २०२१ रोजी होणार होती. मात्र राज्यातील संक्रमण पुन्हा वाढल्याने आता परीक्षेची ही तारीखही रद्द करण्यात आली आहे.