पूर्व नागपूर आरटीओचे कामकाज कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:30 AM2020-11-22T09:30:04+5:302020-11-22T09:30:04+5:30
नागपूर : सरकारने सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी शहरातील कळमना येथे पूर्व नागपूर आरटीओ कार्यालय स्थापन केले. परंतु, येथील कामकाजाच्या कासवगतीने ...
नागपूर : सरकारने सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी शहरातील कळमना येथे पूर्व नागपूर आरटीओ कार्यालय स्थापन केले. परंतु, येथील कामकाजाच्या कासवगतीने लोक त्रस्त आहेत. कार्यालयात नवीन लायसन्स बनविणे, लायसन्सचे नुतनीकरण आणि विशेष म्हणजे लोडिंग गाड्यांच्या ट्रान्सफर संबंधित कामकाजात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कामांसाठी अनेक दिवस लावले जात आहे. संबंधित अधिकारी काम करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही केला जात आहे. काम वेळेवर व्हावे, या हेतूने येथे नागरिक येतात. मात्र, टालमटोल धोरणाने नागरिकांच्या समस्यांत वाढ होत असल्याने नाईलाजास्तव दलालांची मदत घ्यावी लागत आहे.
कार्यालयात जवळपास तीन महिन्यापूर्वी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बदली अन्यत्र करण्यात आल्याने, त्यांचा अतिरिक्त भार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याने कामकाज मंदावल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले. मात्र, विभागाकडून ही बाब नाकारली जात आहे. उलट पूर्वीपेक्षा ज्यादा गतीने कामकाज सुरू असल्याची बतावणी विभागाकडून केली जात आहे.
कोट्स...
दुप्पट गतीने होतेय काम
पूर्व नागपूर आरटीओ विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी पूर्वीपेक्षा अधिक वेगाने येथे कामकाज सुरू असल्याचा दावा केला आहे. परवाना नुतनीकरण, फिटनेस, परमिट आदी असे कोणतेच काम रखडले नाही. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे काम जबाबदारीने पार पाडले जात आहे. क्लरिकल आणि निरीक्षणासोबतच संबंधित कामासाठी पर्याप्त कर्मचारी असल्याने नियमित कामकाज होत असल्याचे विनोद जाधव यांनी सांगितले.
.........