पूर्व विदर्भात उमेदवारांची धावपळ! प्रचाराचा ‘सुपर संडे’, मिळेल तेथे दाेन घास, जनसंवादाचीच आस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 06:29 AM2024-04-15T06:29:15+5:302024-04-15T06:30:17+5:30
उमेदवारांचा सकाळपासूनच सुरू झालेला दिवस रात्री उशिरापर्यंत संपलेलाच नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व रविवार असा याेग साधताना पूर्व विदर्भातील पाचही मतदारसंघांत उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. उमेदवारांचा सकाळपासूनच सुरू झालेला दिवस रात्री उशिरापर्यंत संपलेलाच नव्हता. दिवसभरात मिळेल तेथे दाेन घास पाेटात ढकलून जनसंवादाला वेळ कमी पडणार नाही, याची दक्षता घेतली गेली. साेबतच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांना भेट देत बुद्धविहारांमध्ये वंदना करण्यासही उमेदवार विसरले नाहीत.
नागपुरात भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांचा भर जनसंवाद यात्रांवर आहे. दीक्षाभूमी व संविधान चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जयंतीनिमित्त माल्यार्पण करून त्यांनी दिवस सुरू केला. गडकरी हे भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांची भेट घेऊन लोकसंवाद यात्रेत सहभागी झाले. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनीही दीक्षाभूमी येथे डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत अभिवादन केले.
प्रमुख नेत्यांचा विदर्भात तळ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नाना पटाेले, कन्हैय्या कुमार, बाळासाहेब थाेरात, माणिकराव ठाकरे, चंद्रकांत हंडाेरे अशा दिग्गज नेत्यांमुळे पूर्व विदर्भात आजचा दिवस प्रचाराचा सुपर संडे झाला.
सभा, गाठीभेटी अन् बैठका
गडचिराेलीत भाजपचे खासदार अशोक नेते यांनी धानोरा, आमगाव येथे सभा घेतल्या. काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान हे विजय वडेट्टीवार यांच्यासह भामरागड, घोट, देसाईगंज तालुक्यांतील कोरेगाव येथे सभेत व्यग्र हाेते. चंद्रपुरात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल येथे व्यापारी व विविध सामाजिक संघटनांशी संवाद साधला. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. भंडारामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा असल्याने भाजपचे उमेदवार डाॅ. सुनील मेंढे यांच्यासह पदाधिकारी सकाळपासूनच गुंतले हाेते. काँग्रेसचे उमेदवार डाॅ. प्रशांत पडाेळे यांनी दिवसभर मतदारांच्या भेटीवरच भर दिला.