पूर्व विदर्भात सेना लोकसभेच्या चार जागा जिंकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 09:57 PM2018-08-23T21:57:35+5:302018-08-23T21:59:33+5:30
शिवसेनेतर्फे परत एकदा भाजपावर प्रहार करण्यात आला आहे. सहकारी पक्षांचा सन्मान ठेवण्यात येत नसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांना लावला आहे. यापुढे भाजपासोबत युती करून कुठलीही निवडणूक लढण्यात येणार नाही. तसेच पूर्व विदर्भातील लोकसभेच्या चार जागा सेना निश्चित जिंकणार, असा दावा त्यांनी केला. नागपुरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेतर्फे परत एकदा भाजपावर प्रहार करण्यात आला आहे. सहकारी पक्षांचा सन्मान ठेवण्यात येत नसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांना लावला आहे. यापुढे भाजपासोबत युती करून कुठलीही निवडणूक लढण्यात येणार नाही. तसेच पूर्व विदर्भातील लोकसभेच्या चार जागा सेना निश्चित जिंकणार, असा दावा त्यांनी केला. नागपुरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
वर्धमाननगर येथे झालेल्या या मेळाव्याला खा.आनंद अडसूळ, खा.कृपाल तुमाने, माजी आमदार अशोक शिंदे, नरेंद्र भोंडेकर व जिल्हाप्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव उपस्थित होते. विदर्भाला भाजपाचा बालेकिल्ला बनविण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. आता मात्र शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवून स्वत:ची ताकद वाढवेल. मागील विधानसभा निवडणूकांत मिळालेल्या मतांची संख्या लक्षात घेतली तर शिवसेना पूर्व विदर्भातील चार लोकसभा जागा निश्चित जिंकू शकते. यात रामटेकसमवेत वर्धा, भंडारा, चंद्रपूर यांचा समावेश आहे, असे कीर्तीकर म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरदेखील टीका केली. गडकरी रस्ते तर बनवत आहेत, मात्र दुसरीकडे मंदिर तुटत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. शिवसेना गडकरींच्या विरोधातदेखील दमदार उमेदवार उतरवेल, असे ते म्हणाले. पश्चिम विदर्भातून शिवसेना लोकसभेच्या ३ व विधानसभेच्या २० जागा जिंकेल असे प्रतिपादन अडसूळ यांनी केले.
तत्पूर्वी, मेळाव्यादरम्यान बोलताना कीर्तीकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत शिवसैनिकांनी जनतेच्या समस्यांसंदर्भात आंदोलन करण्याचे निर्देश दिले. यावेळी शेखर सावरबांधे, किशोर कुमेरिया, बंडू तळवेकर, चिंटू महाराज यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
शहराची नवीन कार्यकारिणी दहा दिवसात
नव्वदीच्या दशकात नागपूर विभागात जास्त सक्रियता होती. आता पक्षातील गटबाजीला दूर करून जुन्या लोकांना जोडण्यात येईल. तसेच प्रकाश जाधव यांच्यासारख्या संघटकाची आवश्यकता असल्यामुळे त्याना शहराच्या राजकारणात आणल्या गेले. दहा दिवसाच्या आत शहराची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येईल, असे कीर्तीकर यांनी स्पष्ट केले.
सेना भवनातून थेट ‘वॉच’
विदर्भाच्या बाहेरील लोकांना संपर्क प्रमुख बनविण्याच्या मुद्यावर विचारणा केली असता राजकीय रणनीतींतर्गत त्यांना नागपूरला पाठविण्यात आले असल्याचे कीर्तीकर यांनी सांगितले. मुंबईतील शिवसेना भवनातून कामकाजावर नजर ठेवण्यात येत आहे. ‘बूथ’पातळीवर काम सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात पक्षसंघटनेला मजबूत करण्यात येत आहे. ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान ‘बूथ’स्तरीय संमेलन आयोजित करण्याचीदेखील त्यांनी घोषणा केली.
पंतप्रधानांवर केली टीका
यावेळी गजानन कीर्तीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदी सहकारी पक्षांचा सन्मान करत नाहीत. त्यामुळेच शिवसेनेचे खासदार मोदींसोबत बोलत नाहीत. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा युतीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वबळावरच निवडणुका लढण्याचे ठरविले असल्याची माहिती त्यांनी दिली.