पूर्व विदर्भाला पुन्हा पावसाने भिजवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 09:58 PM2022-10-17T21:58:50+5:302022-10-17T21:59:17+5:30
Nagpur News परतून परतून हजेरी लावणाऱ्या पावसाने साेमवारी पुन्हा पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना भिजवले. नागपूरसह गाेंदिया, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात जाेरदार पाऊस झाला.
नागपूर : परतून परतून हजेरी लावणाऱ्या पावसाने साेमवारी पुन्हा पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना भिजवले. नागपूरसह गाेंदिया, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात जाेरदार पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यालाही परतीच्या पावसाने चांगलेच झाेडपले. विदर्भात मंगळवारीही काही ठिकाणी जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता आहे.
केरळ किनारपट्टीवर तयार झालेले सायक्लाेनिक सर्क्युलेशन उत्तरेकडे वळत असल्याने त्या प्रभावामुळे १६, १७ व १८ ऑक्टाेबर राेजी विदर्भात पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला हाेता. त्यानुसार ऊन आणि पावसाचा खेळ चालला आहे. सकाळी ऊन तापत असताना दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरुवात हाेते, तर कधी रात्री पावसाचा खेळ सुरू हाेताे. साेमवारी नागपुरात सकाळपासून ऊन तापले हाेते. दुपारी २.३० वाजता अचानक आकाशात ढगांची गर्दी जमली आणि पावसाच्या सरी जाेरात बरसल्या. ४.१५ वाजता पाऊस थांबला. मात्र सायंकाळी ६.३० नंतर वातावरण बदलले आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने जाेरदार धडक दिली. चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया, भंडाऱ्यातही रविवारी उघाड हाेता, पण साेमवारी दिवसा पाऊस सरी बरसल्या.
नागपूरला सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ६ मि.मी. पाऊस झाला, तर रात्रीही जाेरदार बरसात झाली. यवतमाळात सायंकाळपर्यंत ३८ मि.मी., चंद्रपूर १८, ब्रह्मपुरी २०, तर गाेंदियात १८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. पाऊस हाेत असला तरी तापमानातही वाढ झाली असून, नागरिकांना ऑक्टाेबर हिटचा त्रास हाेत आहे. दरम्यान, मंगळवारीही पावसाळी वातावरण कायम राहणार असून, त्यानंतर पावसाचा जाेर थांबेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.