पूर्व नागपुरात कोळसा व्यापाऱ्याचे ७० लाख पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:31 AM2018-06-30T00:31:31+5:302018-06-30T00:32:03+5:30

In eastern Nagpur, the coal dealer fled to 70 lakh | पूर्व नागपुरात कोळसा व्यापाऱ्याचे ७० लाख पळविले

पूर्व नागपुरात कोळसा व्यापाऱ्याचे ७० लाख पळविले

Next
ठळक मुद्देकॅशिअरला जखमी करून नोटांची बॅग हिसकावली


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरातील वर्धमाननगरात कोळसा व्यापारी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करून ७० लाख रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता घडली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
तीन दिवसांपूर्वी गँगस्टर पिन्नु पांडेवर झालेल्या गोळीबारानंतर हा शहरातील दुसरा मोठा गुन्हा आहे. कोळसा व्यापारी कैलाश अग्रवाल आणि त्यांचे बंधू दिलीप अग्रवाल यांचे भंडारा मार्गावरील पॉवर हाऊस चौकात शिवम टॉवरमध्ये कार्यालय आहे. दुसऱ्या माळ्यावरील या कार्यालयातून अग्रवाल बंधू कोळशाचा व्यापार करतात. रात्री ८.१० वाजता कैलाश अग्रवाल यांचा मुलगा सचिन कॅशिअर राजेश भिसीकरसोबत घरी जाण्यासाठी निघाला. राजेशच्या हातात नोटांनी भरलेली बॅग होती. त्यात ६०-७० लाख रुपये ठेवले होते. शिवम टॉवरखाली उतरुन सचिन अग्रवाल आणि राजेश भिसीकर कारच्या दिशेने जात होते. या मार्गावर सिमेंट रोडचे काम सुरु आहे. त्यामुळे कार कार्यालयापासून दूर अंतरावर ठेवलेली होती. शिवम टॉवरखाली उतरताच तीन चोरट्यांनी सचिन आणि राजेशच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली तर त्यांच्या दोन साथीदारांनी राजेशपासून नोटांनी भरलेली बॅग हिसकावली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सचिन घाबरला. परंतु राजेशने नोटांनी भरलेली बॅग घट्ट पकडली होती. राजेश बॅग सोडत नसल्याचे पाहून चोरट्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. जखमी झाल्यामुळे राजेशची बॅगवरील पकड सैल झाली आणि चोरट्यांनी बॅग हिसकावून पळ काढला. चोरटे भंडारा मार्गावर पॉवर हाऊस चौकाच्या दिशेने पळाले.
घटनेच्या वेळी शिवम टॉवर जवळ बरेच लोक होते. परंतु कुणीही मधे आले नाही. राजेश व सचिन तात्काळ रुग्णालयात पोहचवून पोलिसांना घटनेची सूचना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे डीसीपी संभाजी कदम, झोन-३ चे डीसीपी राहुल माकनीकर, लकडगंज ठाण्याचे निरीक्षक संतोष खांडेकरसह मोठ्या संख्येने पोलीस दल घटनास्थळावर पोहचले होते. पोलिसांनी आरोपीच्या शोधात परिसरात धरपकड मोहीम सुरू केली आहे. परंतु उशिरापर्यंत आरोपीचा कुठलाच सुगावा लागला नाही.
आरोपींना माहिती होती
सूत्रांच्या मते आरोपी हे अग्रवाल यांच्या व्यवसायाची व कार्यपद्धतीची माहिती होती. सांगण्यात येते की आरोपी अर्धा तास परिसरात फिरत होते. अग्रवाल बंधू कोळश्याचे मोठे व्यापारी आहे. संशय आहे की आरोपीचे सहकारी पॉवर हाऊस चौकात दुचाकी वाहनावर वाट बघत होते.
स्ट्रीट लाईट बंद होते
घटनेच्या वेळी घटनास्थळावर स्ट्रीट लाईट बंद होते. त्यामुळे परिसरात अंधार पसरला होता. त्यामुळे आरोपींचे कृत्य सहज घडले. पोलीस स्ट्रीट लाईट बंद होण्याच्या कारणांचा शोध घेत आहे. रात्री उशिरापर्यंत राजेश भिसीकर याच्यावर उपचार सुरू होता.
व्यापाऱ्यांमध्ये तीव्र रोष
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पूर्व नागपुरातील बरेच व्यापारी घटनास्थळावर पोहचले. त्यांनी तीव्र रोष व्यक्त करीत, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांचे म्हणणे होते की, पूर्व नागपुरात लुटपाटीच्या घटना वाढल्या आहे. बहुतांश प्रकरणात पोलीस आरोपींपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Web Title: In eastern Nagpur, the coal dealer fled to 70 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.