खते, बियाण्यांसोबत सुलभ कर्ज पुरवठा : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 08:35 PM2019-05-27T20:35:36+5:302019-05-27T20:45:09+5:30

शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देत असतानाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते तसेच पीक कर्ज वेळेवर उपलब्ध तसेच फळबाग लागवडीला विशेष प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खरीप नियोजनाबाबत प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा घेऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

Easy lending with fertilizer, seeds: Chandrashekhar Bawankule | खते, बियाण्यांसोबत सुलभ कर्ज पुरवठा : चंद्रशेखर बावनकुळे

खते, बियाण्यांसोबत सुलभ कर्ज पुरवठा : चंद्रशेखर बावनकुळे

Next
ठळक मुद्देखरीप हंगामपूर्व नियोजनाचा आढावा, खरीप मार्गदर्शनासाठी ग्रामनिहाय ग्रामसभा५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजनकापूस, सोयाबीन, धान व फलोत्पादनाला प्राधान्य

लोकमत न्यूज
नागपूर : शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देत असतानाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते तसेच पीक कर्ज वेळेवर उपलब्ध तसेच फळबाग लागवडीला विशेष प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खरीप नियोजनाबाबत प्रत्येक गावात विशेष ग्रामसभा घेऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्याचा सन २०१८-१९ मधील कृषी हंगामाचा खरीप सन २०१८-१९ चे नियोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आ. समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, गिरीश व्यास, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खरीप हंगामाचे नियोजन करताना गावनिहाय आढावा घेऊन शेतकऱ्यांना सुलभपणे बियाणे, खते उपलब्ध होईल अशा पद्धतीने नियोजन करताना फलोत्पादन कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातर्फे एक कोटी रुपयांचे विशेष अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकºयांना त्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा करण्यासाठी तालुकानिहाय कर्ज मेळावे घेण्यासोबतच महसूल, कृषी व बँकांच्या प्रतिनिधींनी शेतकºयांना सुलभ कर्ज उपलब्ध होईल व तसेच शंभर टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ९७९ कोटी ५५ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ९ टक्के कर्ज पुरवठा झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या उद्दिष्टापैकी ६७ कोटी ११ लक्ष रुपयांचे तर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे २१ कोटी ७५ लक्ष रुपये, ग्रामीण बँकांनी ४ कोटी २९ लक्ष रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
खरीप हंगामाचे नियोजन करताना कापूस २२ हजार ५०० हेक्टरमध्ये, सोयाबीन १ लाख हेक्टरमध्ये, भात ९४ हजार हेक्टरमध्ये, तूर ६ हजार ५०० हेक्टरमध्ये नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामामध्ये १ लाख ४३ हजार ४५० मेट्रिक टन खतांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ५१ हजार ३७१ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पात मागील वर्षी सिंचनाकरिता कमी प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याच्या पाळ्या कमी मिळाल्या. यासाठी शासनस्तरावर सिंचनासाठी वेगवेगळे उपाय राबविण्यात येत आहेत. येत्या खरीप हंगामात धान पिकासाठी पेंच प्रकल्पाचे पुरेसे पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांना अन्न पिकांकडे वळविणे आवश्यक आहे. याकरिता पीक नियोजन व पिकांच्या बदलासाठी शेतकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन आणि मार्गदर्शन करण्यात यावे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना मदत देण्याचे शासनाचे धोरण आहे.
सौर कृषीपंप जोडणीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा केली. सन २०१८-१९ या वर्षात सौर कृषीपंप योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील १९५ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून ८२ अर्जांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी प्राप्त करण्यात आली आहे. कृषी सहाय्यकांची पदभरती खरीप हंगामापूर्वी करण्यात यावी. याबाबत गुणवत्तेनुसार समांतर आरक्षणाची राखीव पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सन २०१८-१९ कृषी उत्पादनाचा आढावा व सन २०१९-२० खरीप कृषी उत्पादन कार्यक्रमाचे नियोजन या पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन तसेच चोर बीटीच्या कापूस बियाणाची खरेदी या भित्तीपत्रिकाचे विमोचन करण्यात आले.
१ जूनपासून गावाला भेटी देऊन मार्गदर्शन
खरीप हंगामाचे नियोजन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात कृषी सहायक व कृषी तज्ज्ञ बैठक घेऊन शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरित करून पीक पद्धतीबद्दल मार्गदर्शन करावे. पेंच प्रकल्पातील कमी झालेल्या सिंचन क्षमतेनुसार सिंचित होणारे क्षेत्र व सिंचित न होऊ शकणारे क्षेत्र वेगवेगळे काढून त्यानुसार शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणारी पिके घेण्याबाबत त्यानुसार तुषार सिंचन संचाचा वापर, पीक बदलाबाबत उद्युक्त करण्यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी १ ते ३० जून २०१९ या कालावधीत प्रत्येक गावा-गावात भेटी देऊन खरीप पीक नियोजनाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन करावे. तसेच या दौऱ्याचा व्हिडिओ ऑनलाईन पालकमंत्र्यांना सादर करावा. अद्याप सुरू न झालेल्या पाणीवाटप संस्थांचे पुनरुज्जीवन करून पाणी वाटप संस्था सुरू करण्याबाबत तसेच शेतकऱ्यांमध्ये पाणी वापराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बोगस बियाण्यांविरुद्ध कारवाईसाठी भरारी पथक
कापसावरील गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाल्यामुळे काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी. खरीप हंगामात कोणाच्याही कृषी केंद्रामार्फत दर्जाहिन बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री होणार नाही. तसेच बोगस बियाणे विक्रीवर अंकुश ठेवण्याकरिता भरारी पथके नेमून याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या वतीने जनजागृती निर्माण करण्यात यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

 

Web Title: Easy lending with fertilizer, seeds: Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.