गुटखा नव्हे, सोप खा
By admin | Published: July 29, 2014 12:52 AM2014-07-29T00:52:35+5:302014-07-29T00:52:35+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्वच्छतेसाठी अधिष्ठात्यांपासून ते अधीक्षकांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन त्यांना सोप देऊन
मेडिकलची गांधीगिरी : स्वच्छतेला घेऊन रुग्णालय प्रशासन गंभीर
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्वच्छतेसाठी अधिष्ठात्यांपासून ते अधीक्षकांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन त्यांना सोप देऊन गांधीगिरी केली. विशेष म्हणजे, सोमवारी सकाळी १० वाजतापासून सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमात अर्ध्या तासातच गुटख््यांच्या पुडीने बादली भरली.
महिनाभरापूर्वी ‘मिसेस सीएम’ सत्त्वशीला चव्हाण यांनी मेडिकलला भेट दिली. त्यांनी येथील अस्वच्छतेवर नाराजी व्यक्त केली होती. याची स्वत: दखल घेत पुणे येथील १० स्वच्छता कर्मचाऱ्यांना मेडिकलमध्ये पाठविले. येथील कर्मचाऱ्यांनी स्वच्छता कशी करावी, याचे जणू धडेच दिले. मागील अनेक वर्षांमध्ये कधीही न झालेली स्वच्छता या चमूने १२ दिवसांत करून दाखविली. त्यामुळे ही स्वच्छता नेहमीसाठी कायम राहावी यासाठी मेडिकल प्रशासनाने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, नव्याने पदभार सांभाळलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ, उपअधीक्षक डॉ. सुभाष ठाकरे आणि डॉ. रमेश पराते हे स्वच्छतेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याच कल्पनेतून ही गांधीगिरी करण्यात आली.
आज सकाळी १० वाजताच्या सुमारास मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, डॉ. एन.जी. तिरपुडे, डॉ. अपूर्व पावडे, डॉ. हेडाऊ, डॉ. पराते, डॉ. ठाकरे, डॉ. मटकरी यांनी बाह्यरुग्ण विभागा(ओपीडी)समोर उभे राहून गुटखा खाऊन येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नागरिकांना थांबविले. त्यांच्याशी प्रेमाने बोलून गुटखा तोंडातून बाहेर फेकण्याची विनंती केली. बाजूला पाणी भरून ठेवलेल्या बादलीतून पाणी घ्यायला लावून चूळ भरण्यास सांगितले. खिशातील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ बादलीत टाकण्यासही सांगितले. त्यानंतर त्यांना सोप खाऊ घातली.
विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांनी कोणत्याही माणसाचे खिसे तपासले नाही. या एक तासाच्या वेळेत अधिकाऱ्यांनी १२५ च्यावर लोकांना सोप खाऊ घातली. मेडिकल प्रशासनाचा दंड न आकारता रुग्णालयात गुटखाबंदीला घेऊन स्वच्छता पाळण्याचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)