‘पंचगव्य’ सेवन करा, ‘कोरोना’ला लांब ठेवा; गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:31 AM2020-03-18T11:31:08+5:302020-03-18T11:31:28+5:30
गाईच्या पंचगव्यापासून शरीराची क्षमता वाढते आणि आज जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंपासून लांब राहता येते, असा दावा देवलापारच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरात सार्स, स्वाईन फ्लू, चिकन गुन्यासारख्या विषाणूंचा इतिहास सगळ्यांनीच बघितला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यावर प्रतिकारक औषधांवर संशोधन केले जाते. मात्र, आयुर्वेदात अशा विषाणूंचा प्रभाव टाळण्यासाठी मानवाची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याचे गुण सांगितले आहेत. गाईच्या पंचगव्यापासून शरीराची क्षमता वाढते आणि आज जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंपासून लांब राहता येते, असा दावा देवलापारच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने केला आहे. बडकस चौक येथील केंद्राच्या मुख्य कार्यालयात मंगळवारी पत्रपरिषदेत हा दावा केंद्राचे समन्वयक सुनील मानसिंहका व नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्यासह डॉ. हेमंत जांभेकर, डॉ. संजय काते, वैद्य नंदिनी भोजराज व सनत गुप्ता यांनी केला.
डॉ. तपन चक्रवर्ती यांनी कोरानाची लक्षणे आणि त्यासंदर्भात घ्यावयाच्या काळजीवर प्रकाश टाकला. कोरोना विषाणूने जगाला विळखा घातला आहे. त्यातुलनेत भारतात याचा प्रभाव कमी दिसून येत आहे. त्याचे कारण आपल्याकडील रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. कोरोना विषाणू चार मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचा असल्याने, तो स्वत: लांब जाऊ शकत नाही किंवा उडूही शकत नाही. हा विषाणू संसर्गामुळेच होतो, हे सिद्ध झाले आहे. संसर्ग होऊ नये म्हणून गोमूत्र अर्क आणि गोमूत्र आसव हे दोन उपाय अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आज देशभरात दहा लाखावर लोक अर्क व आसवाचे सेवन करीत आहेत. यापूर्वी स्वाईन फ्लूच्या वेळी आम्ही याचा प्रयोग केला तेव्हा ७५ टक्के सेवन करणाऱ्या लोकांना स्वाईन फ्लूची बाधा झाली नव्हती आणि ज्यांना झाली त्यांना अगदी सौम्य बाधा झाल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गोमूत्र अर्क, गोमूत्र आसव यासह नस्य व धुपम ही प्रक्रिया उत्तम असल्याचा दावा त्यांनी केला. यावरील संशोधनाचे प्रस्ताव केंद्रातर्फे पाठविण्यात येत असून, देशभरातून आयुर्वेदिक तज्ज्ञांचेही याला समर्थन असल्याचे सुनील मानसिंहका यांनी सांगितले. अॅलोपॅथी औषधांनी रोग होऊच नये, याची काळजी कधीच घेतली नाही. मात्र आपल्याकडील आयुर्वेदाने प्राचीन काळापासून कुठल्याही विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना आधीच स्पष्ट केल्याचेही ते म्हणाले.