‘लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ’; अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भवादी करणार हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 09:20 PM2022-11-23T21:20:42+5:302022-11-23T21:21:45+5:30
Nagpur News ‘लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ’ असा निर्धार करून हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल करण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर : वेगळ्या विदर्भाची मागणी कायम निकाली काढण्यासाठी ‘लाठी खाऊ, गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ’ असा निर्धार करून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अधिवेशनावर हल्लाबोल करण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे असून विदर्भातील जनता १०० वर्षे महाराष्ट्रात राहिली तरी हा अनुशेष भरून निघणार नसून वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय असल्याचे चटप यांनी सांगितले. हल्लाबोल मोर्चात विदर्भाच्या ११ जिल्ह्यांतील १२० तालुक्यांतून १० हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मोर्चाला १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम येथून सुरुवात होणार आहे. पंचशील चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, विधानभवन या मार्गाने मोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलनाला विदर्भ माझा, नाग विदर्भ आंदोलन समिती, जांबुवंतराव धोटे विचार मंच, राष्ट्रीय जनता दल आदी संघटना, विदर्भवादी नेत्यांनी पाठिंबा दिल्याचे चटप यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे मुकेश मासुरकर, तात्यासाहेब मते, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, नरेश निमजे, गुलाबराव धांडे, वीणा भोयर, नौशाद हुसेन उपस्थित होते.