दोनच वेळा खा, लठ्ठपणा व मधुमेहाला दूर ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 09:51 AM2018-06-18T09:51:59+5:302018-06-18T09:52:10+5:30
लठ्ठपणा व मधुमेहाला दूर ठेवायचे असेल तर कडक भूक लागण्याच्या दोन वेळाच जेवण करा असा अनोखा सल्ला ‘स्थुलत्व आणि मधुमेह मुक्त अभियानाचे’ प्रमुख व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लातूरच्या जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लठ्ठपणा व मधुमेहाला दूर ठेवायचे असेल तर कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा आणि त्या दोन वेळानाच जेवण करा. आपले जेवण ५५ मिनिटात संपवा. दोन जेवणाच्या मध्ये काहीही खाऊ नका. जेवताना शक्यतो गोड कमी खा किंवा टाळा व जेवणातील प्रथिने वाढवा, असा अनोखा सल्ला ‘स्थुलत्व आणि मधुमेह मुक्त अभियानाचे’ प्रमुख व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लातूरच्या जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला.
सप्तक प्रस्तुत व दालचिनी आणि पर्सिस्टंट यांच्या सहकार्याने रविवारी ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय आयुक्त अनुप कूमार, अभय जोशी, समीर बेंद्रे, विलास मानेकर व डॉ. जगन्नाथ दीक्षित उपस्थित होते. डॉ. दीक्षित म्हणाले, ‘दोन वेळा खा आणि वजन कमी करा’ या संकल्पनेवर सर्वप्रथम डॉ. श्रीकांत जिचकार यांनी १९९७ ते २००४ पर्यंत मोठी मोहीम राबवली होती. हा प्रयोग स्वत:वर केल्यामुळेच तीन महिन्यात माझे वजन आठ किलोंनी व पोटाचा घेर दोन इंचानी कमी झाला. ‘डाएट प्लॅनिंग’ द्वारे केला जाणारा हा फंडा मधुमेहाच्या रुग्णांसाठी मात्र नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत स्त्रियांच्या लठ्ठपणात जगात तिसरा
डॉ. दीक्षित म्हणाले, जगभरात लठ्ठपणा व मधुमेहाची समस्या वेगाने वाढत आहे. जगात पुरुषांमध्ये लठ्ठपणात भारताचा पाचवा तर स्त्रियांबाबत तिसरा क्रमांक लागतो. देशात २० वर्षांपुढील व्यक्तीमध्ये मधुमेहाचे प्रमाण ८.७ टक्के आहे. यापैकी निम्म्या रुग्णांना मधुमेह असल्याचे माहिती नसल्याचे वास्तव आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मेंदुतील रक्तस्राव व कर्करोग आदींचा धोका वाढतो. लठ्ठपणाला प्रतिबंध करता येतो. एकही पैसा खर्च न करता, डॉक्टरांकडे न जाता वजन कमी करता येऊ शकते. याच उपायने मधुमेहाचा प्रतिबंध देखील करू शकतो, असेही ते म्हणाले.
डॉ. दीक्षित म्हणाले, रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढले की, शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. इन्सुलीनमुळे लठ्ठपणा येतो. शरीरात इन्सुलिन दोन प्रकारचे तयार होते. एक पायाभूत स्राव आणि दुसरे म्हणजे खाण्यामुळे होणारा स्राव. पायाभूत स्राव मध्ये १८ ते ३२ युनिट इन्सुलिन स्रवत असते. याला थांबवता येत नाही, मात्र खाण्यामुळे २८ ते ३२ युनिट स्रवणाऱ्या इन्सुलिनवर नियंत्रण आणता येते. कोणताही पदार्थ खाल्ला की शरीरात इन्सुलिन स्रवते. आहाराचे प्रमाण कितीही कमी जास्त असले तरी सारख्याच प्रमाणात इन्सुलिन स्रवते. विशेष म्हणजे, एकदा इन्सुलिन तयार झाल्यानंतर परत ५५ मिनिटे तयार होत नाही. म्हणूनच कोणत्याही दोन वेळा खाण्यासाठी पाळल्या तर त्या दोन वेळातच इन्सुलिन ‘सिक्रीट’ होऊ शकतो. रक्तातील इन्सुलिन लेव्हल कमी झाली की यकृतमधील ग्लायकोजनमधून ग्लुकोज रिलीज होत जाते. नंतर ‘फॅटी अॅसिड’ फॅट्सपासून निघते व त्यापासून ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने शरीरातील ‘फॅट्स’ नैसर्गिकपणे कमी होऊ लागतात व मनुष्याचे वजन आपोआप कमी होत जाते.
दोन जेवणाच्या मध्ये हे घ्या
डॉ. दीक्षित म्हणाले, सर्वसाधारणपणे मनुष्याला भूक लागली, असे दोन वेळा होते. सकाळी ९ वाजता संध्याकाळी ६ वाजता किंवा दुपारी १२.३० वाजता आणि रात्री ८.३० वाजता अशा त्या वेळा असतात. आपण जर कटाक्षाने दोनच वेळा पाळल्या तर इन्सुलिन स्रवण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते. या दोन जेवणाच्या मधे केवळ पाणी, पातळ ताक, बीन साखरेचा ग्रीन टी, ब्लॅक टी, नारळ पाणी, टोमॅटोच्या एक दोन फोडी खाता येईल, असेही ते म्हणाले.