‘अमृत’ भारताला न लागाे विघटनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:11 AM2021-08-15T04:11:09+5:302021-08-15T04:11:09+5:30

नागपूर : आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत साेहळा साजरा करताे आहाेत. पंचाहत्तरी गाठताना अनेक परिवर्तने देशाने पाहिली आहेत. अनेक प्रकारच्या ...

Eclipse of disintegration without affecting India | ‘अमृत’ भारताला न लागाे विघटनाचे ग्रहण

‘अमृत’ भारताला न लागाे विघटनाचे ग्रहण

Next

नागपूर : आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत साेहळा साजरा करताे आहाेत. पंचाहत्तरी गाठताना अनेक परिवर्तने देशाने पाहिली आहेत. अनेक प्रकारच्या समस्या, साधी सुई न घडण्याइतके उद्याेगाचे मागासलेपण केव्हाचे मागे टाकून कधी महासत्तांशी स्पर्धा करायला लागलाे; पण जागतिक महासत्ता हाेण्याचे स्वप्न दाखविताना ‘उष:काल हाेता हाेता...’ ही भावना निर्माण हाेणाऱ्या स्वातंत्र्याेत्तर काळातील ज्येष्ठांची चिंता पुन्हा चिंतन करायला लावणारी आहे. देशाभिमान आटला का, धार्मिक उग्रवाद बळावला का, अशा कितीतरी शंका त्यांच्या मनात आहेत.

गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे, या भावनेने लोकं झपाटले होते. देशाप्रती बलिदानाची भावना तेव्हा लोकांमध्ये होती. स्वातंत्र्यानंतर शहिदांना न विसरता देश पुढे जावा, ही भावना लोकांमध्ये होती. आज त्या स्वातंत्र्याचे महत्त्व राहिले नाही. राजकारणात निव्वळ स्वार्थ दडला आहे. खरे देशप्रेम सीमेवर लढणाऱ्या सैनिकांत आहे. राजकारण्यांनी तर देशप्रेम खिशात टाकले आहे. त्यामुळे पुढची १०० वर्षे देशाचे स्वातंत्र्य टिकेल की नाही, अशी भीती आहे.

- गोविंदराव देशपांडे, ज्येष्ठ नागरिक ()

--------------------------------------------

‘भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. रक्ताचे पाट वाहिले तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा श्वास आमच्या नशिबी आला. आज सर्वच क्षेत्रात प्रगती पथावर आहे; पण सध्याची परिस्थिती पाहता गरिबी, बेरोजगारी, शासकीय संपत्तीचे खासगीकरणाने जनता त्रस्त आहे. त्यामुळे आधुनिक भारताचे स्वप्न उराशी बाळगलेल्या शहिदांचे बलिदान व्यर्थ तर जाणार नाही ना? अशी शंका निर्माण होते.

-रामगोविंद खोब्रागडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल ()

------------------------------------------------------------

आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना मनात खंत आहे. धार्मिक ऐक्याच्या संवादाने चालणारा देश अचानक धर्माच्या नावाने विखंडित केला जात आहे. कामगार, कष्टकऱ्यांनी अनेक कठीण परिस्थितीचा सामना केला; पण सध्याच्या काळात त्यापेक्षा वाईट परिस्थिती भोगावी लागत आहे. खासगीकरण करून उपेक्षित वर्गाला पुन्हा शिक्षणापासून वंचित केले जात आहे. संस्थांचे खासगीकरण हाेत आहे. त्यामुळे हा देश पुन्हा पारतंत्र्यात जाणार, असे संकेत दिसत आहेत.

- हरीश धुरट, कामगार नेता. ()

------------------------------------------------------

गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढाईत भारतीयत्वाची भावना निर्माण केली. या भावनेने सारेच भारावले होते. आम्ही इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील वानर सेनेत काम करीत होतो. तहान-भूक, घरदार कशाचीच भ्रांत त्यावेळी नव्हती. फक्त देश स्वतंत्र व्हावा, हाच ध्यास होता; मात्र भारतीयत्वाची भावना आज राहिलेली नाही. पुन्हा आपण जाती, धर्मात वाटले जात आहोत. उग्रवाद वाढला आहे. आज जेवढे जास्त राजकीय पक्ष तेवढे लोक वाटले जात आहेत. आज देशाला समाजवादाची गरज आहे.

पं. केदारनाथ रामकृपाल पांडे, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी ()

-----------------------------------------------------

स्वातंत्र्यानंतरच्या काळात उद्योगांसमोर अनेक संकटे उभी होती. नोकरशाहीत देश दबला होता; पण जागतिकीकरणानंतर सर्वांसाठी द्वारे खुली झाली. सरकारच्या अनेक योजना आहेत; पण योग्य वेळी त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे. उद्योगांसमोर अजूनही अनेक संकटे आहेत. औद्योगिक क्षेत्रात भारताचे नाव जगात सर्वोच्च स्थानी न्यायचे असेल तर उद्योगांना चालना देण्याची गरज आहे.

अजित दिवाडकर, ज्येष्ठ उद्योजक ()

----------------------------------------------

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देशाने बरेच कमावले. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आम्ही शाळेत शिकत होतो; मात्र आंदोलनाची जाण होती. आज देशाची प्रगती झाली. सर्वांना हक्क कळले. देश सार्वभौम होणार आहे. जगाच्या पातळीवर भारताचा डंका राहणार आहे.

- हुकूमचंद मिश्रिकोटकार, निवृत्त वित्त व लेखा अधिकारी ()

Web Title: Eclipse of disintegration without affecting India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.