राणी तलाव मोक्षधामचे ग्रहण सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:09 AM2021-04-01T04:09:43+5:302021-04-01T04:09:43+5:30

कामठी : कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम घाटाच्या विकासाचा संकल्प सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने आजवर करण्यात आला. यानंतर येथील विविध ...

The eclipse of Rani Talao Moksha Dham did not end | राणी तलाव मोक्षधामचे ग्रहण सुटेना

राणी तलाव मोक्षधामचे ग्रहण सुटेना

Next

कामठी : कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम घाटाच्या विकासाचा संकल्प सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने आजवर करण्यात आला. यानंतर येथील विविध विकास कामांचे पाचवेळा भूमिपूजनही करण्यात आले. मात्र येथे अद्यापही रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी वाहनांच्या लाईट किंवा टॉर्चचा वापर करावा लागतो. त्यामुळे राणी तलाव मोक्षधाम घाटाची उपेक्षा कधी थांबणार, असा सवाल येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

कामठी-आजनी मार्गावरील राणी तलाव मोक्षधाम घाटावर कामठी शहरातील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र या घाटावर अद्यापही मृतदेह जाळण्यासाठी ओटे नाही. परिसरात हायमास्ट लाईट नाही तसेच पाण्याची समस्या आहे.

राणी तलाव मोक्षधामवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी १९९६ मध्ये स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी तत्कालीन शिवसेनेचे खासदार संजय निरुपम यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार खासदार निधीतून निरुपम यांनी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. यानंतर येथे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यादरम्यान नगर परिषदेत सत्तापरिवर्तन झाल्याने आलेला निधी दुसऱ्याच कामावर खर्च करण्यात आला. १९९७ मध्ये तत्कालीन खासदार व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्याही हस्ते येथील सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते.

त्यानंतर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांनीही २००० साली येथील विकास कामांचे भूमिपजून केले होते. मात्र यानंतर कोणतेही काम येथे झाले नाही. २००१ मध्ये माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनीही येथील प्रवेशद्वारासाठी पुढाकार घेतला. मात्र तेही काम रखडले. २०१८ मध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणी तलाव मोक्षधाम सौंदर्यीकरणाच्या विकासाकरिता ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यानंतर कामठी नगर परिषदअंतर्गत विविध विकास कामाला सुरुवात झाली. मात्र राणी तलाव मोक्षधाम घाटावरील समस्या कायमच आहे. त्यामुळे येथील कामात होणाऱ्या दिरंगाईच्या कारणाचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. न.प. प्रशासनाने यासंदर्भात लक्ष देण्याची मागणी राणी तलाव मोक्षधाम विकास समितीचे अध्यक्ष हरिशंकर गुप्ता, डॉ. संदीप कश्यप, अ‍ॅड. गोपाल शर्मा, लाला खंडेलवाल, विनोद संगेवार व इतर नागरिकांनी केली आहे.

Web Title: The eclipse of Rani Talao Moksha Dham did not end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.