सीताबर्डी मार्केटला ग्रहण

By admin | Published: August 9, 2016 02:38 AM2016-08-09T02:38:39+5:302016-08-09T02:38:39+5:30

हॉकर्स आणि व्यापाऱ्यांच्या वादामुळे सीताबर्डी बाजारात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी

Eclipse to the Sitabaldy Market | सीताबर्डी मार्केटला ग्रहण

सीताबर्डी मार्केटला ग्रहण

Next

नागपूर : हॉकर्स आणि व्यापाऱ्यांच्या वादामुळे सीताबर्डी बाजारात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री हॉकर्सनी येथील व्यापारी पिता-पुत्राला बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी सोमवारी दुपारी बाजारपेठ बंद ठेवली. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत सीताबर्डी पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी तत्पूर्वीच या प्रकरणातील तिघांना अटक केल्याचे सांगितल्याने व्यापारी शांत झाले.
दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर १० ते १२ हॉकर्सनी शनिवारी रात्री कापड व्यापारी निशांक आणि त्यांचे वडील प्रसन्ना मोदी या व्यापारी पिता-पुत्राला बेदम मारहाण केली. यामुळे सीताबर्डीतील व्यापारी संतापले आहेत. संतप्त व्यापारी सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास पोलीस ठाण्यावर धडकले. त्यांनी हॉकर्सच्या गुंडगिरीचे अनेक किस्से पोलीस आणि पत्रकारांना सांगितले. व्यापारी म्हणाले, मेनरोडवर हॉकर्सची मनमानी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.
ग्राहकांनाही त्यांचा त्रास होतो. त्यांना कुणी काही म्हटले की गुंडगिरी करतात. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. हॉकर्सने आता व्यापाऱ्यांशी मारपीट करणे सुरू केले आहे. त्यांच्यावर अंकूश बसविला नाही तर ग्राहकांनाही त्याचा त्रास होणार असल्याचे व्यापारी म्हणाले. रात्रीच्या सुमारास या मार्गावर पोलिसांची गस्त वाढविणे गरजेचे आहे, असेही व्यापारी पोलीस अधिकाऱ्यांंशी बोलताना म्हणाले. या घटनेचा निषेध म्हणून दुपारी बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी चद्रकांत रघटाटे, संदीप बावने, विजय मेहाडिया, गोविंद मिरपुरी, निशांक मोदी, प्रसन्न मोदी यांच्यासह मोठ्या संख्येत अन्य व्यापारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

वाहनांच्या पार्किंगसाठी अडचण
सीताबर्डी मेन रोडवर हॉकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग लाईनच्या पुढे हॉकर्सची दुकाने लागत आहेत. त्यामुळे वाहनांचे पार्किंग करणे कठीण झाले आहे.

पोलीस आयुक्तांची घेणार भेट
सीताबर्डी पोलीसांकडून या प्रकरणात योग्य कारवाई न झाल्यास पोलीस आयुक्तांची भेट घेण्यात येणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर मारहाणीच्या घटनेची तक्रार मिळताच पोलिसांनी धावपळ करून सुमित मोतीराम लिल्हारे ( रा. महाकाली नगर, मानेवाडा), सुरज ताराचंद दुुंडे, (रा. काचीपुरा) आणि कुणाल रमेश रंगारी (रा. ड्रॅगन पॅलेस मागे, कामठी) या तिघांना अटक केली. त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात असल्याचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी सांगितले.

Web Title: Eclipse to the Sitabaldy Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.