नागपूर शहरातील पाच घाटावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:33 PM2019-09-26T12:33:12+5:302019-09-26T12:35:11+5:30
नागपूर शहरातील अंबाझरी घाटावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यात येते. आता यात पुन्हा चार दहन घाटांची भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अंबाझरी घाटावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करण्यात येते. आता यात पुन्हा चार दहन घाटांची भर पडली आहे. या दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी मोफत मोक्षकाष्ठ उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र अंत्यसंस्कारासाठी लाकडे हवी असल्यास यासाठी पैसे मोजावे लागणार आहे.
गेल्या वर्षी स्थायी समितीच्या बैठकीत चार दहन घाटावर अंत्यसंस्कारासाठी मोक्षकाष्ठ उपलब्ध करण्याला मंजुरी देण्यात आली होती. महापालिका प्रशासनाने यासंबंधीचे आदेश नुकतेच जारी केले आहे. पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेणाऱ्या व बायोकोल पुरवठा करणाºया संस्थेला मोक्षकाष्ठ पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
शहरातील सर्व दहन घाटावर महापालिकेतर्फे मोफत लाकडे व गोवऱ्या उपलब्ध केल्या जातात. पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी अंबाझरी घाटानंतर मानकापूर, मानेवाडा, सहकारनगर व मोक्षधाम या घाटावर मोक्षकाष्ठ उपलब्ध क रण्यात येणार आहे. यासाठी दहनघाटावर आवश्यक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. पिंजऱ्यात गोवऱ्या व मोक्षकाष्ठ (बायोमास ब्रिकेट किंवा बायोकोल) या दहन सामुग्रीचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यात येतील.
धामिंक भावना विचारात घेता मोफत मोक्षकाष्ठ उपलब्ध असूनही कुणी अंत्यसंस्कारासाठी लाकडाची मागणी केल्यास यासाठी शुल्क आकारून लाकडे उपलब्ध करण्याची व्यवस्थाही राहणार आहे. परंतु पर्यावरणाचा विचार करता नागरिकांचा मोक्षकाष्ठाचा वापर करण्याला मिळेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.
लाकडावरील खर्चात बचत
शहरातील दहन घाटावर महापालिकेकडून लाकडाचा मोफत पुरवठा केला जातो. यासाठी एका अंत्यसंस्कारावर २२११ रुपये खर्च येतो. सर्व घाटावर वर्षाला ८ ते १० कोटींचा खर्च केला जातो. मात्र बायोकोल किंवा बायोमास ब्रिकेटचा वापर करून अंत्यसंस्कार केल्यास १७५० रुपये खर्च येणार आहे. म्हणजेच एका अंत्यसंस्कारावर ४६१ रुपयांची बचत होणार आहे. पाच दहन घाटावरील प्रतिसाद विचारात घेता, शहरातील अन्य घाटावरही मोक्षकाष्ठ उपलब्ध करण्याचा महापालिकेचा विचार आहे.