'हा' फटका लावताच यातून उगवतात झाडं आणि भाज्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 02:15 PM2021-11-01T14:15:30+5:302021-11-01T14:19:02+5:30
Diwali 2021 : 'सीडबॉल'चे फटाके, हे फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात जाणारा कागद खराब कागदांवर प्रक्रिया करून बनवला जातो. तसेच, हे फटाके लावल्यानंतर, यातून विविध प्रकारची झाडं आणि पालेभाज्या उगवतात.
नागपूर : दिवाळी म्हटलं की फराळ, नवीन कपडे, मौज-मज्जा आणि फटाक्यांचा आवाज अस काहीसं वातावरण असतं. यंदा मात्र, वाढते प्रदुषण आणि कोविडच्या संसर्गामुळे अनेक राज्यांत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु यासोबतच सध्या बाजारात पर्यावरणपूरक फटाक्यांचीही तितकीच चर्चा आहे.
दिवाळीनिमित्त बाजारात सर्वत्र नागरिकांची चहलपहल आहे. ठिकठिकाणी रांगोळी, दिवे, फटाक्यांची दुकाने सजली आहेत. दरवर्षी सणावारात मोठ्या प्रमाणात फटाके वापरले जातात. फटाक्यांच्या कर्कश आवाजाचा लहान मुलांना आणि वृद्धांना जास्त त्रास होतो. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालावी, यासाठी पर्यावरणवादी आग्रही असतात. पण सध्या बाजारात चर्चा सुरू आहे 'सीडबॉल'ची.
होय, सीडबॉलचे फटाके, हे फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात जाणारा कागद खराब कागदांवर प्रक्रिया करून बनवला जातो. तसेच, हे फटाके लावल्यानंतर, यातून विविध प्रकारची झाडं आणि पालेभाज्या उगवतात. त्यामुळे, हे पर्यावरणपूरक फटाके आता तुम्ही कितीही घेतले तरी तुम्हाला कोणीही विरोध करू शकणार नाही.
पारडसिंगा येथे ग्राम आर्ट प्रोजेक्टच्या माध्यमातून बनलेल्या या फटाक्यांना सहजतेने कुठेही पेरता येऊ शकतं. हे फटाके पाण्यात भिजवून जमिनीवर ठेवले की त्यातील बिया जमिनीत पेरल्या जातात. त्यानंतर आवश्यक तेव्हा पाणी दिलं की त्यातून झाड किंवा भाज्या उगवतात. लंवगी फटाक्यांमध्ये टोमॅटो, गवार, मिरची तर लक्ष्मी बॉम्बमध्ये आपटे व भेंडिचे बी आहेत. यासोबत अन्य विविध प्रकारच्या फटाक्यांमध्ये मुळा, घोळ, पालक, लाल चवळी, अंबाडी, काकडी, कांदा आणि वांगे अशा विविध प्रकारच्या बिया आहेत.
हे भन्नाट पर्यावरणपूरक फटाके पर्यावरणवादी कार्यकर्ती श्वेता भट्टड यांनी तयार केले आहे. त्यांनी तयार केलेल्या या फटाक्यांना आता बाजारात हळुहळू मागणी वाढताना दिसत आहे. त्यांच्या या उपक्रमाचं नाव 'सीडबॉल' असं आहे. श्वेता भट्टड यांच्या टीमने गेल्या १० हजार फटाक्यांचे दीड हजार सेट तयार केले होते. यातील ८ सेटची विक्री गेल्याच वर्षी झाली आहे.
फटाक्यांच्या या सीडबॉलची किंमत २९९ ते ८६० रुपयांपर्यंत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या पारडसिंगा गावात श्वेता आणि त्यांची टीम पर्यावरण रक्षणासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवते. सीडबॉल देखील श्वेता यांचा पर्यावरणपूरक उपक्रम आहे. या उपक्रमात आता अनेक लोकं स्वत:हून सहभागी होत आहेत. तसेच आसपासच्या सात गावातील जवळपास १०० महिलांना अशाप्रकारचा सीडबॉल बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यामुळे संबंधित महिलांना दिवसाला २५० ते ३०० रुपये रोजगारही मिळत आहे.
तर मग वाट कसली बघताय, हे पर्यावरणपूरक आणि हटके असणारे फटाके विकत घ्या आणि धूमधडाक्यात दिवाळी साजरी करा.