‘स्वच्छ भारत’साठी आता ‘इकोफ्रेंडली’ थूकदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:35 AM2018-04-11T10:35:18+5:302018-04-11T10:35:32+5:30

जागोजागी थुंकणाऱ्या बहाद्दारांमुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका प्रचंड असतो. अशा व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून नागपुरातील बहिणभावाने एक अनोखे संशोधन केले व चक्क खिशात मावणारे ‘इकोफ्रेंडली थूकदान’च तयार केले आहे.

'EcoFriendly' spitpot for 'Clean India' now | ‘स्वच्छ भारत’साठी आता ‘इकोफ्रेंडली’ थूकदान

‘स्वच्छ भारत’साठी आता ‘इकोफ्रेंडली’ थूकदान

Next
ठळक मुद्देबहीण-भावाची कमाल‘पिचकारी’बहाद्दरांना डोळ्यासमोर ठेवून संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविण्यात येत असताना खर्रा, तंबाखू, पान खाऊन रस्त्यांवर ‘पिचकारी’ मारणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा आपला जन्मसिद्ध अधिकारच आहे, अशीच अनेकांची मानसिकता असते. मात्र रस्ता असो, कार्यालय असो किंवा अगदी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, जागोजागी थुंकणाऱ्या अशा बहाद्दारांमुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका प्रचंड असतो. अशा व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून नागपुरातील बहिणभावाने एक अनोखे संशोधन केले व चक्क खिशात मावणारे ‘इकोफ्रेंडली थूकदान’च तयार केले आहे. रितू व प्रतीक मल्होत्रा असे या नवसंशोधकांचे नाव असून कमी वयात त्यांनी एक अनोखा आदर्शदेखील निर्माण केला आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांकडूनदेखील थुंकण्याचे प्रमाण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक रोगांच्या जंतूंचा थुंकीवाटेच प्रसार होतो. थूकदान घेऊन फिरण्याचा तर धावपळीच्या युगात प्रश्नच येत नाही. मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनदेखील थुंकण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. अशा स्थितीत आपण नेमके काय करू शकतो, या विचारातून मल्होत्रा भावंडांना ही संकल्पना सुचली. दोघांनीही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तांत्रिक अभ्यास व संशोधन करुन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ‘इझिस्पीट’ नावाचे ‘इकोफ्रेंडली थूकदान’च तयार केले. अगदी सहजतेने खिशात मावेल अशा पद्धतीचे हे ‘पॅकेट’ असून त्यात विशिष्ट घटकांचा उपयोग करण्यात आला आहे. ज्यावेळी थुकायचे असेल तेव्हा हे ‘पॅकेट’ खिशातून काढायचे व थुकायचे इतकेच वापरणाऱ्याला करायचे आहे. यात विशिष्ट पद्धतीचे ‘अ‍ॅबसॉर्ब मटेरियल’ वापरण्यात आले आहे. यामुळे थुंकी या ‘मटेरियल’मध्ये शोषल्या जाते व काही वेळातच त्याचे रुपांतर ‘क्रिस्टल्स’मध्ये होते. त्यामुळे खिसा ओला होण्याचा किंवा ‘पॅकेट’मधून दुर्गंध येण्याची शक्यताच राहत नाही. एका ‘पॅकेट’मध्ये २५ वेळा थुंकता येते व त्याला यातील घटकांचे विघटन सहज शक्य आहे.

कुठलाही जंतूसंसर्ग नाही
रितू व प्रतीक मल्होत्रा यांनी खिशात मावू शकेल व कारमध्येदेखील वापरता येईल, असे ‘पॅेकेट’ व ‘कंटेनर’ स्वरूपातील ‘थूकदान’ तयार केले आहेत. थुंकी जमिनीवर पडल्यानंतर त्यातील तापमान वाढते व त्यानंतर त्यातून जंतूसंसर्गाचा धोका जास्त वाढतो. परंतु ‘इझिस्पिट’मध्ये वापरण्यात आलेल्या ‘अ‍ॅबसॉर्ब मटेरियल’मुळे तापमान वाढत नाही व त्यातील जंतू नष्ट होतात. विशेष म्हणजे यातून कुठलाही दुर्गंध येत नाही. ‘पॅकेट’ला ‘झिप’ असल्यामुळे थुंकी बाहेर ओघळण्याची कुठलीही शक्यता नाही. ‘कंटेनर’प्रमाणे आता ‘पॅकेट’देखील पेपरपासूनच तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतीक मल्होत्रा याने दिली.

‘स्वच्छ भारत’ला मिळेल बळ
आम्ही याच्या ‘पेटंट’साठी अर्ज केला आहे. ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविण्यात येत असताना रस्त्यांवर बिनदिक्कतपणे थुंकणारे लोक पाहून आम्ही अस्वस्थ व्हायचो. यातूनच हे संशोधन साकारले. असे मत रितू मल्होत्रा हिने व्यक्त केले. दोघांनाही संशोधनामध्ये प्रतीक हरडे याचेदेखील मौलिक सहकार्य लाभले.

Web Title: 'EcoFriendly' spitpot for 'Clean India' now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.