सक्षम पत्रकारितेतूनच देशाला आर्थिक आणि सामाजिक न्याय : सिद्धार्थ वरदराजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:39 AM2020-02-05T00:39:44+5:302020-02-05T00:41:18+5:30
पत्रकारिता ही मूल्यांवर आधारलेली असते. त्यामुळे सक्षम पत्रकारिताच या देशातील लोकशाही बळकट करू शकते तसेच या देशातील आर्थिक आणि सामाजिक न्यायही यातूनच मिळविला जाऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक सिद्धार्थ वरदराज यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्रकारिता ही मूल्यांवर आधारलेली असते. त्यामुळे सक्षम पत्रकारिताच या देशातील लोकशाही बळकट करू शकते तसेच या देशातील आर्थिक आणि सामाजिक न्यायही यातूनच मिळविला जाऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक सिद्धार्थ वरदराज यांनी केले.
दीक्षाभूमी येथील ऑडिटोरियम सभागृहात मंगळवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मूकनायक’ पत्रकारितेचा शताब्दी समारंभ झाला. अध्यक्षस्थानी प्रा. रणजित मेश्राम होते. ज्येष्ठ संपादक सुभाष शिर्के आणि कार्यक्रमाचे आयोजक आवाज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमन कांबळे मुख्य पाहुणे होते.
प्रश्न विचारण्याची हिंमत विसरलात तर पत्रकारितेला काहीच अर्थ नाही, असे डॉ. आंबेडकर म्हणायचे, याची आठवण करून सिद्धार्थ वरदराज म्हणाले, मीडियावर सामाजिक जबाबदारी मोठी असते. मात्र आज मीडिया धोक्याच्या वळणावर उभा असल्याचा इशारा त्यांनी दिला. मीडियात सामाजिक प्रश्नांना हवे तेवढे स्थान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेबांनी मूकनायकची सुरुवातच बहुजनांचा अर्थात भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी केली होती. मात्र १०० वर्षांनंतरही असे होत नसेल तर लोकशाही धोक्यात आहे, असे समजावे लागेल. व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. मात्र त्यात खरेपणा जपा, असे अवाहन पत्रकारितेतील नवोदितांना केले. दिसते ती सत्य परिस्थिती मांडा. सतत व्यक्त होत राहा, तिरंग्याचा आदर्श पायदळी तुडविणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा, असा सल्ला त्यांनी दिला.
सुभाष शिर्के म्हणाले, पत्रकारितेतील बाबासाहेबांची दृष्टी वेगळी होती. त्यांचे पत्रकारितेतील मोठेपण देशातील तत्कालीन नेत्यांना उशिरा कळले. मीडियाची शक्ती त्यांनी ओळखली होती, मात्र बहुजन समाजाने मीडियाकडे लक्ष दिले नाही. देशातील मीडियात कोणत्या समाजाचे किती आहेत याचा सर्वे व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रा. रणजित मेश्राम म्हणाले, बाबासाहेबांची पत्रकारिता म्हणजे समाजाचा आरसा होती. त्यांचा संतसाहित्यावर प्रचंड अभ्यास होता. त्यांनी विषमतेवर सतत प्रहार केले. मूकनायक आणि नंतरच्या पत्रकारितेतून त्यांनी पेरलेले बीज लोकशाही सशक्त करणारे आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या मुख्य पाहुण्या अरफा खानन शेरवानी येऊ शकल्या नाहीत. यांचा संदेश यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आला. प्रास्ताविक अमन कांबळे यांनी केले. संचालन राजेंद्र फुले यांनी केले. नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.