देशातील आर्थिक मंदी जाणीवपूर्वक : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 08:02 PM2020-01-20T20:02:38+5:302020-01-20T20:04:51+5:30
आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतात ४० टक्के लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहतात. त्यामुळे या देशात आर्थिक मंदी कधीच येऊ शकत नाही. आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली.
प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशातील पहिल्या पंतप्रधानांपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत एकाही पंतप्रधानांना देशात आर्थिक परिस्थिती चांगली लाभली नाही. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पहिल्यांदा देशात चांगली आर्थिक परिस्थिती लाभली. परंतु त्यांनी याचा फायदा घेतला नाही. उलट नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन या देशातील छोट्या उद्योगांचे कंबरडे मोडण्याचे काम केले. यातच जीएसटीसारखा निर्णय घेतला. हा सर्व प्रकार आरएसएसचा छुपा अजेंडा या देशात राबवण्यासाठी केलेला होता. हा देश कसा चालवावा याचे एक ‘फ्रे मवर्क’ ज्याला आरएसएसचे संविधानही म्हणता येऊ शकेल, असे तयार आहे. २००३ साली अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना मी खासदार होतो. तेव्हा आरएसएसची राज्यघटना मी लोकसभेच्या पटलावर ठेवली होती. त्यांचे संपूर्ण फ्रेमवर्क कसे तयार आहे, हे मी सांगितले होते. ते आजही लोकसभेत आहे.
सीएए-एनपीआर,एनआरसी हा त्यातलाच प्रकार आहे. अगोदर सरकार एनपीआर आणणार आहे. त्यानंतर एनआरसी लावण्यात येईल. सीएएच्या माध्यमातून केंद्र सरकार असे सांगत आहे की, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून येणारे हिंदू, बौद्ध, पारशी, जैन, सीख आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व दिले जाईल. परंतु हे केवळ एक बूम आहे. अगोदर नागरिकत्व घालवायचे आहे. नागरिकत्व गेले की संपत्तीचा अधिकार जातो. हा आरएसएसचाच अजेंडा असून, याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सावरकरांचा सन्मान करण्यापूर्वी त्यावर चर्चा व्हावी
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारी होते. परंतु यासोबतच इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या पत्रिसरकारच्या विरोधात त्यांची भूमिका राहिली आहे. एकूणच सावरकर यांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. तेव्हा त्यांचा सन्मान करीत असताना त्यावर चर्चा झाली पाहिजे.