नागपुरात बाजारपेठा सुरू झाल्यानंतरच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 01:27 AM2020-05-23T01:27:58+5:302020-05-23T01:34:19+5:30

नागपूर शहर रेड झोनमधून बाहेर काढण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण मनपा आयुक्तांच्या मागणीनंतर शहराला पुन्हा रेड झोनमध्ये टाकल्यानंतर दुकाने सुरू करण्यावर निर्बंध आले. शुक्रवारी मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धंतोली, सीताबर्डी, सक्करदरा, इतवारी आणि शहराच्या विविध भागातील दुकाने बंद केली. खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि बाजारपेठा सुरू झाल्या तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया नागपुरातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

The economy will get a boost only after the opening of markets in Nagpur | नागपुरात बाजारपेठा सुरू झाल्यानंतरच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

नागपुरात बाजारपेठा सुरू झाल्यानंतरच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

Next
ठळक मुद्देखरेदी-विक्री नियमित सुरू करा : विविध व्यापारी संघटनांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर रेड झोनमधून बाहेर काढण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण मनपा आयुक्तांच्या मागणीनंतर शहराला पुन्हा रेड झोनमध्ये टाकल्यानंतर दुकाने सुरू करण्यावर निर्बंध आले. शुक्रवारी मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धंतोली, सीताबर्डी, सक्करदरा, इतवारी आणि शहराच्या विविध भागातील दुकाने बंद केली. खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि बाजारपेठा सुरू झाल्या तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया नागपुरातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे दुकानदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. संपूर्ण व्यवसायच ठप्प झाला आहे. बाजारपेठा बंद असल्याने अर्थव्यवस्था ढासळली. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतर दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळाली. पण ती पुन्हा बंद झाल्याने व्यापारी नाराज झाले आहेत. बाजारपेठा सुरू झाल्यानंतरच व्यापार रुळावर येईल आणि कार्यरत कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
महाल-केळीबाग रोड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी म्हणाले, महाल, केळीबाग आणि बडकस चौक भागात ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. पण लॉकडाऊननंतर संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला. बाजारपेठा उघडल्यानंतरही खरेदीसाठी लोकांची मानसिकता तयार होणार नाही. त्याला वेळ लागेल. ग्राहकांच्या सोयीसाठी शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करण्यास व्यापारी तयार आहेत. आता मार्केट नियम आणि अटींसह उघडण्यास परवानगी द्यावी. रेडिमेड स्टोअर्सचे विश्वास जैन म्हणाले, सीताबर्डी आणि धरमपेठ भागात दुकाने उघडण्याची मनपाने परवानगी द्यावी. मार्केट सुरू झाल्यास ग्राहकही सावधता बाळगून खरेदीसाठी घराबाहेर पडतील. सध्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आवश्यक वस्तू मिळत नसल्याने ग्राहकही त्रस्त आहेत.
सक्करदरा दुकानदार असोसिएशनचे पदाधिकारी शीतल खानोरकर म्हणाले, सक्करदरासह विविध भागातील दुकाने सुरू करण्यास मनपाने मान्यता द्यावी. नियमांचे पालन करून दुकानांचे संचालन करण्यास व्यापारी तयार आहेत. जवळपास दोन महिन्यापासून ठप्प असलेल्या व्यापाराला संजीवनी देण्याचे काम मनपाने केल्यास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आतातरी दुकाने सुरू करण्यास मनपाने संधी द्यावी. कॉस्मेटिक वस्तूंचे व्यापारी रोशन चावला म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंप्रमाणे दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या कॉस्मेटिक वस्तूंची दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. या वस्तू कालाबाह्य होण्याचा कालावधी कमी असल्याने बंद दुकानात ठेवता येत नाही. दोन महिन्यांपासून दुकाने बंद आहेत. बºयाच वस्तू खराब झाल्या आहे. त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आता दुकाने सुरू करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे.

Web Title: The economy will get a boost only after the opening of markets in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.