नागपुरातील डब्बा प्रकरणाचे झाकण फोडणार ईडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:05 AM2019-08-24T11:05:04+5:302019-08-24T11:08:14+5:30

देशभरात खळबळ निर्माण करणाऱ्या डब्बा प्रकरणाची बंद पडलेली चौकशी प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) सुरू केली आहे.

ED to break cover of Dabba case in Nagpur | नागपुरातील डब्बा प्रकरणाचे झाकण फोडणार ईडी

नागपुरातील डब्बा प्रकरणाचे झाकण फोडणार ईडी

Next
ठळक मुद्देचौकशी सुरू, धक्कादायक घडामोडींचे संकेत संबंधित वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरात खळबळ निर्माण करणाऱ्या डब्बा प्रकरणाची बंद पडलेली चौकशी प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) सुरू केली आहे. नागपूरसोबतच मुंबई, अहमदाबाद, जयपूर तसेच दिल्लीशी जुळलेल्या ईडीच्या तारा शोधण्यासाठी ईडी सक्रिय झाल्याने धक्कादायक घडामोडींचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमतने डब्बा प्रकरणाचा सर्वप्रथम खुलासा केला होता. डब्बा व्यापारी कुशल लद्दड आणि वीणा सारडा यांच्यातील आर्थिक व्यवहारात कटुता आल्याने डब्ब्याचे झाकण फुटले होते.
बोभाटा झाल्यामुळे गुन्हे शाखेने १२ मे २०१६ ला डब्बा चालविणाऱ्यांच्या घरी आणि कार्यालयात छापेमारी केली होती. त्यात आढळलेल्या कागदपत्रांच्या आधारे २४ जणांना आरोपी बनवून कुशल लद्दड, प्रितेश लखोटिया, गोविंद सारडा, विजय गोखलानी, अभिषेक बजाज, नीरज अग्रवाल, अश्विन बोरीकर, विकास कुबडेंसह १० जणांना अटक केली होती. तर, रवी अग्रवाल, वीणा सारडा, कन्नी थावरानी, सचिन अग्रवालसह १४ आरोपींनी स्वत:ची अटक टाळण्यात यश मिळवले होते. या घडामोडीमुळे डब्बा व्यापाराचे नागपूर प्रमुख केंद्र असल्याचे पोलीस तपासात त्यावेळी उघड झाले होते. डब्बा व्यवहारातून नागपूरसह ठिकठिकणाच्या शहरात रोज लाखो कोटींचा व्यवहार होत असल्याचे तसेच या गोरखधंद्यात गुंतलेली मंडळी इंदोरच्या सौदा सॉफ्टवेअरचा वापर करत असल्याची चर्चा होती. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत संगणक, हार्ड डिस्कमधून धक्कादायक बाबी पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. प्रारंभी या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी केली. नंतर मात्र पोलीस या प्रकरणाच्या तपासात हतबल झाल्यासारखे वागू लागले. दरम्यान, अनेक महत्त्वपूर्ण पुरावे गायब झाल्याची ओरड झाली अन् या पार्श्वभूमीवर, पोलिसांना गुंगारा देणाऱ्या डब्बा प्रकरणाच्या सूत्रधारांसह अनेकांना जामीन मिळाला. सरकारचा कोट्यवधींचा कर चुकविणाऱ्या आणि रोज लाखो-करोडोंचा गोरखधंदा करवून देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करणाऱ्या या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिका धक्कादायक होती. त्यामुळे चौकशी दुसऱ्या तपास यंत्रणांना सोपविली जाणार, असा अंदाज होता. तो आता खरा ठरला. गेल्या महिन्यात ईडीने बंद पडलेल्या डब्बा प्रकरणाच्या तपासाचे झाकण पुन्हा उघडले.
बचावासाठी ‘छत्राची’ शोधाशोध
सूत्रांच्या माहितीनुसार, डब्याचे कनेक्शन नागपुरातील एका सीएसह छत्तीसगडमधील काही दिग्गजांसोबत असल्याची चर्चा होती. म्हणूनच पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकून हा तपास थंडबस्त्यात टाकण्यात आल्याची चर्चा होती. ईडीने तपास हाती घेतल्याने संबंधित वर्तुळाचे धाबे दणाणले आहे. डबा प्रकरणातील आरोपींच्या आर्थिक व्यवहाराची माहिती एकत्रित केली जात असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर, संबंधित वर्तुळातील मंडळांनी स्वत:च्या बचावासाठी ‘छत्र’ शोधणे सुरू केले आहे.

Web Title: ED to break cover of Dabba case in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार