हवाला कारभाराच्या तपासात लागली ईडी-आयटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 03:00 PM2021-11-29T15:00:58+5:302021-11-29T15:13:18+5:30
२६ नोव्हेंबरला अनाज बाजारात भुतडा चेंबरसह चार ठिकाणी धाड टाकण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांना ८६.४६ लाख रुपये मिळाले होते. पोलिसांनी ११ जणांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले होते.
नागपूर : इतवारीच्या भुतडा चेंबरसह चार खासगी लॉकरमध्ये झालेल्या कारवाईत ईडी आणि आयटी सक्रिय झाली आहे. पोलिसांच्या सूचनेवरून दोन्ही केंद्रीय एजन्सीज्नी तपास सुरू केला आहे. दरम्यान, आज १२ लाख रुपये मिळाल्यामुळे जप्त केलेली रक्कम ९८.४६ लाखांवर पोहोचली आहे.
झोन तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वाखाली २६ नोव्हेंबरला अनाज बाजारात भुतडा चेंबरसह चार ठिकाणी धाड टाकण्यात आली होती. या कारवाईचा उद्देश हवालाचा व्यवसाय बंद करणे होता. पोलिसांना तीन ठिकाणी ८६.४६ लाख रुपये मिळाले होते. पोलिसांनी ११ जणांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची शनिवारी सायंकाळी सुटका करण्यात आली होती. चौकशीत रविवारी १२ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
पोलिसांनी रोख रक्कम भादंविच्या कलम ४१(१) नुसार जप्त केली आहे. ही रक्कम कोणत्या उद्देशाने आणली होती आणि यात कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. ज्या व्यक्तींच्या लॉकरमधून ही रक्कम जप्त केली, त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत जाणून घेण्यासाठी आयकर विभाग आणि ईडीकडे हे प्रकरण सोपविण्यात आले आहे. त्यांनी आपला तपास सुरू केला आहे.
भुतडा चेंबरसह तीन-चार खासगी लॉकर्सवर कारवाई करण्यात आली आहे. तेथे देखरेखीसाठी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. त्यांना पाहून व्यापारी तेथे जाण्याचे टाळत आहेत. भुतडा चेंबरची बहुतांश लॉकर्स व्यापाऱ्यांची आहेत. त्यांचा हवाला कारभाराशी काही संबंध नाही. परंतु त्यांनी व्यापाराच्या कारभारासाठी रक्कम लॉकर्समध्ये ठेवली आहे. त्यांना ईडी आणि आयटीच्या कार्यालयात चकरा माराव्या लागतील, ही चिंता भेडसावत आहे.
सर्वाधिक वाईट अवस्था सराफा व्यापाऱ्यांची आहे. सराफा बाजारातील बहुतांश मोठे व्यापारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खासगी लॉकर्समध्ये दागिने आणि सोने ठेवतात. लग्नाचा सिझन असल्यामुळे व्यापाऱ्यांना वेळेवर डिलिव्हरी देण्याची चिंता भेडसावत आहे.