नाना पटोलेंचे वकील ईडीच्या रडारवर; ॲड. सतीश उके यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:15 AM2022-03-31T10:15:21+5:302022-03-31T18:03:06+5:30
फडणवीसांच्या विरोधात खटला लढत असलेल्या उकेंच्या घरावर ईडीचा पहाटेच्या सुमारास छापा
नागपूर: अनेक काँग्रेस नेत्यांचे वकीलपत्र घेतलेले आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे ॲड. सतीश उके यांच्या पार्वतीनगर येथील घरी गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाइल, लॅपटॉप ईडीने जप्त केले आणि कागदपत्रांची पाहणी केली. सहा तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ॲड. सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना अटक केली.
ॲड. सतीश उके विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सातत्याने आरोप करीत आहेत. न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी ॲड. उकेंनी सनसनाटी आरोप करीत अनेक महत्त्वाचे दावे केले होते, आणि फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. ॲड. सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत, हे विशेष. आजच्या कारवाईने नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे.
काही आठवड्यांपूर्वी एका ६० वर्षीय महिलेने ॲड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करीत पोलिसांकडे तक्रार दिली होती. ॲड. सतीश उके नागपुरातील प्रेस क्लबमध्ये एका दुसऱ्या विषयावर पत्रपरिषद घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने असू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुरावे नष्ट करण्यासाठी धाड टाकल्याचा आरोप
लॅपटॉपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या केसेस, भविष्यातील केसेस आणि न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण, निमगडे खून प्रकरणाचे पुरावे होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील आमच्याकडे असलेले पुरावे नष्ट करण्यासाठीच ही धाड घातली असल्याचा आरोप प्रदीप उके यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला.