अनिल देशमुखांच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 11:03 PM2021-05-25T23:03:14+5:302021-05-25T23:04:34+5:30
ED raids on Anil Deshmukh's close associates शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात गृहमंत्रीपद गमावणारे अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीय लोकांवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाडी टाकल्या. मुंबईहून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर कार्यालयाच्या मदतीने चार ठिकाणी कारवाई केली. ईडीच्या धाडीमुळे देशमुख आणि त्यांच्याशी जुळलेल्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात गृहमंत्रीपद गमावणारे अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीय लोकांवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाडी टाकल्या. मुंबईहून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर कार्यालयाच्या मदतीने चार ठिकाणी कारवाई केली. ईडीच्या धाडीमुळे देशमुख आणि त्यांच्याशी जुळलेल्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप लावल्यानंतर देशमुख अडचणीत आले आहेत. सीबीआयने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने २४ एप्रिलला देशमुख यांच्याशी जुळलेल्या लोकांविरुद्ध नागपूर आणि मुंबईत चौकशी अभियान राबविले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्याविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई आणि नागपूरच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नागपुरात चार ठिकाणी धाडी टाकल्या. प्राप्त माहितीनुसार हरेकृष्णा अपार्टमेंट, शिवाजीनगर येथील व्यापारी सागर भटेवरा यांच्या घरी धाड टाकली. सागर हे सुपारीचा व्यवसाय करतात. ते देशमुख यांचे निकटवर्तीय समजले जातात. देशमुख गृहमंत्री झाल्यानंतर ते जास्त सक्रिय झाले होते. ईडीने सदर येथील न्यू कॉलनी येथील समित आयजॅक यांच्या बंगल्यावरही धाड टाकली. समित हेसुद्धा देशमुख निकटवर्तीय समजले जातात. त्यांचे शहरातील एका चर्चित कुटुंबासोबत नाते आहे. जाफरनगर येथे कादरी यांच्या घरीही ईडीने धाड टाकली. याच प्रकारे छिंदवाडा रोड येथील प्रसिद्ध सीए कार्यालय आणि घरीही अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. सीए देशमुख यांच्या कुटुंबीयांशी जुळले असून त्यांच्या कंपनीत नॉन एक्झिक्युटिव्ह संचालक असल्याचे सांगितले जाते. त्यांनी देशमुख कुटुंबीयांसोबत मुंबईत संपत्ती खरेदी केल्याचे समजते.
दिवसभर चाललेल्या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे. ईडीच्या नागपूर शाखेचे अधिकारी देशमुख कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांची माहिती गोळा करीत आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्याविरुद्धही कारवाई होण्याची शक्यता आहे. धाडींमुळे देशमुख कुटुंबीयांशी जुळलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.