नागपूरच्या छापेमारीचे आसाम, म्यानमार, इंडोनेशियात धक्के: अनेक वर्षांपासून सुरू होते तस्करीचे सिंडिकेट
By योगेश पांडे | Published: December 2, 2022 12:09 PM2022-12-02T12:09:24+5:302022-12-02T12:10:12+5:30
गुवाहाटीत कॅप्टन जाळ्यात फसला अन् सूत्रे हलली
नागपूर : नागपुरात सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी झाल्यावर केवळ मध्य भारतातच नव्हे तर अगदी थेट आसाम, मिझोराम, म्यानमार व इंडोनेशियातदेखील याचे झटके बसले आहेत. या व्यापाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट होते व इंडोनेशियातील सुपारी म्यानमार, आसाममार्गे नागपुरात तस्करी व्हायची. विशेष म्हणजे बंदी असलेल्या सुपारीची नागपूरमार्गे मध्य भारतात मोठ्या प्रमाणात विक्री व्हायची. अनेक वर्षांपासून हे सिंडिकेट सुरू होते व तस्करीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी शेकडो कोटींचे आयातशुल्काची चोरी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मूळचा नागपूरचा असलेला जसबीर सिंह छटवाल हा यातील एक मोठा धागा होता. मागील वर्षभरापासून आसाम पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. त्याच्या शोधासाठी दिल्ली, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेशात मोठी कारवाई करण्यात आली होती. मात्र कॅप्टन वारंवार आपले लपण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडता आले नव्हते. काही दिवसांपूर्वी तो गुवाहाटी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अखेर, विशिष्ट माहितीच्या आधारे, गुवाहाटी पोलिसांना गुन्हे शाखेच्या पथकाने बेलटोला येथे त्याला दोन दिवसांपूर्वी अटक केली.
गुवाहाटीत अटक झालेला कॅप्टन म्यानमारमार्गे इंडोनेशियन सुपारी भारतात आणत असे. नागपूर ही मध्य भारतातील सुपारीची मोठी बाजारपेठ आहे. येथे दररोज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय होतो. इंडोनेशिया, थायलंड आणि श्रीलंकेतून सुपारी बोलावली जाते. तसेच बंदी घातलेली इंडोनेशियन सुपारीदेखील तस्करी करून विकली जाते. ज्यात दरवर्षी कोट्यवधींचा महसूल बुडतो.
‘ऑपरेशन ऑलआउट’दरम्यान समोर आली व्यापाऱ्यांची नावे
ईडीने छापेमारी केलेले व्यापारी अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर होते. सिलचर येथे आसाम पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑलआउट’च्या माध्यमातून सिंडिकेटमधील काही तस्करांना ऑगस्ट महिन्यात अटक केली होती. त्यांच्याकडून नागपुरातील व्यापाऱ्यांची नावेदेखील समोर आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सडक्या सुपारीला मोठी मागणी
नागपूर व मध्य भारतात अनेक ठिकाणी खर्रा खाण्याचे प्रमाण जास्त आहे. खर्रा तयार करताना इंडोनेशियातील सडकी सुपारी वापरण्यात येते. इंडोनेशियात सडकी सुपारी अक्षरश: फेकण्यात येते व तीच सुपारी तस्करीच्या माध्यमातून मध्य भारतात येते. आसाममधून ओडिशा, छत्तीसगडमार्गे ही सुपारी नागपुरात येते. काही वेळा नकली बिल्टीदेखील बनविण्यात येते. यासंदर्भात पोलिसांकडून अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. मात्र कारवाईचे स्वरूप लहान असते व त्यातून बडे मासे बाहेरच होते.