नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 09:14 PM2022-12-01T21:14:37+5:302022-12-01T21:17:29+5:30

Nagpur News नागपुरातील सुपारी तस्करीत गुंतलेल्या व्यापाऱ्यांवर ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली. आठहून अधिक ठिकाणी धाडी टाकल्याने खळबळ उडाली.

ED raids on betel nut traders in Nagpur | नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी

नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापाऱ्यांमध्ये खळबळ, अनेक भूमिगत८ हून अधिक ठिकाणी धाड

नागपूर : नागपुरातील सुपारी तस्करीत गुंतलेल्या व्यापाऱ्यांवर ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली. आठहून अधिक ठिकाणी धाडी टाकल्याने खळबळ उडाली. या कारवाईसाठी दोन दिवसांअगोदरच ईडीचे अधिकारी नागपुरात पोहोचले होते. सुपारी तस्करीत गुंतलेल्या या व्यापाऱ्यांकडून त्यांच्या व्यवसायाची कागदपत्रे तसेच रोख रकमेसह चल-अचल मालमत्तेची कागदपत्रेदेखील जप्त करण्यात आली.

सुपारी तस्करीत सहभागी असलेल्या नागपूरच्या जसबीर सिंग छटवाल उर्फ कॅप्टन याला गुवाहाटी पोलिसांनी २९ नोव्हेंबर रोजी अटक केली. तो नागपुरातील बाबादीपसिंग नगर येथे राहणारा असून तो येथूनच व्यवसाय करत होता. नागपूर ही सुपारीची मोठी बाजारपेठ आहे. यानंतर ईडीने नागपुरातील व्यापाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचे नियोजन केेले. दिल्ली व मुंबईहून अधिकारी नागपुरात पोहोचले होते. आठहून अधिक ठिकाणी धाड टाकण्यात आली. गुरुवारी सकाळी सहा वाजता ईडीच्या पथकाने सीआरपीएफ जवानांसह पूर्व नागपुरातील इतवारीच्या मस्कासाथ, शांतीनगरसह सुमारे ८ ठिकाणी तस्करीत गुंतलेल्या व्यापाऱ्यांची दुकाने, कार्यालये आणि गोदामांवर छापे टाकले. अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली. कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. मस्कासाथच्या 'केरळ गली'मध्ये एका मोठ्या सुपारी व्यापाऱ्याचे घर आहे. ईडी आणि सीआरपीएफने या घराला घेराव घातला.

कारवाईची बातमी इतवारीतील व्यापाऱ्यांमध्ये झटपट पसरली. घाईगडबडीत बंदी घातलेल्या विदेशी सुपारीच्या व्यवसायाशी संबंधित व्यापारी भूमिगत झाले. काही जणांनी गोडाऊनमधून माल काढण्यास सुरुवात केली तर काहींनी कागदपत्रांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. या व्यापाऱ्यांमध्ये गोयल, कलीवाला, भद्रा, बावला यांच्यासह आठहून अधिक व्यापाऱ्यांचा समावेश होता. ईडीने ही कारवाई गुप्त ठेवली होती.

बंदी घातलेल्या इंडोनेशियन सुपारीच विक्री

गुवाहाटीत अटक झालेला कॅप्टन म्यानमारमार्गे इंडोनेशियन सुपारी भारतात आणत असे. तो मागील वर्षभरापासून तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. नागपूर ही मध्य भारतातील सुपारीची मोठी बाजारपेठ आहे. येथे दररोज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय होतो. इंडोनेशिया, थायलंड आणि श्रीलंकेतून सुपारी बोलविली जाते. तसेच बंदी घातलेली इंडोनेशियन सुपारी देखील तस्करी करून विकली जाते. ज्यात दरवर्षी करोडोंचा महसूल बुडतो. सीबीआयने मार्च २०२१ मध्ये व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Web Title: ED raids on betel nut traders in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.