ईडीकडून नागपूरच्या एम्प्रेस मॉलची ४८३ कोटींची संपत्ती जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 08:47 PM2019-05-14T20:47:31+5:302019-05-14T20:48:23+5:30
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नागपूर विभागाने प्रिव्हेंटेशन ऑफ मॅनी लॉन्ड्रिंग अॅक्ट-२००२ (पीएमएलए) अंतर्गत मंगळवारी कारवाई करताना केएसएल अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (केएसएल) या मुंबईशी संबंधित कंपनीच्या नागपुरातील एम्प्रेस मॉलची ४८३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नागपूर विभागाने प्रिव्हेंटेशन ऑफ मॅनी लॉन्ड्रिंग अॅक्ट-२००२ (पीएमएलए) अंतर्गत मंगळवारी कारवाई करताना केएसएल अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (केएसएल) या मुंबईशी संबंधित कंपनीच्या नागपुरातील एम्प्रेस मॉलची ४८३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.
रकमेचा निवासी संकुल व व्यावसायिक बांधकामासाठी उपयोग
ईडीने जप्त केलेल्या संपत्तीमध्ये एम्प्रेस मॉलमधील २ लाख ७० हजार ३७४ चौरस फूट जागेचा समावेश आहे. वर्ष २००२ मध्ये शुक्रवारी तलावाजवळील एम्प्रेस मिल बंद झाल्यानंतर केएसएल इंडस्ट्रीजने मिलची जागा खरेदी केली आणि त्यावर निवासी संकुल व एम्प्रेस मॉल बांधले आहे. केएसएल इंडस्ट्रीजसोबत संबंधित असलेले उद्योजक प्रवीण कुमार तायल हे पूर्वी बँक ऑफ राजस्थानचे अध्यक्ष होते. या समूहाने पुलगाव आणि कळमेश्वर येथील बंद झालेली टेक्सटाईल मिल वर्ष २०१० मध्ये विकत घेतली होती. त्यानंतर जमिनीचा वापर व्यावसायिक आणि निवासी परिसर स्थापन करण्यासाठी केला होता.
बँक ऑफ इंडिया व आंध्र बँकेकडून ५२४ कोटींचे कर्ज
ईडीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तायल समूहांतर्गत कार्यरत अॅक्टिफ कॉर्पोरेशन लिमिटेड, जयभारत टेक्सटाईल्स अॅण्ड रियल इस्टेट लिमिटेड, केकेटीएल लि., आणि एक्के नीट (इंडिया) लि. या कंपन्यांनी २००८ मध्ये बँक ऑफ इंडिया आणि आंध्र बँकेकडून ५२४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचा एनपीएमध्ये समावेश झाला होता. समूहाने कर्जाऊ घेतलेली रक्कम नंतर शेल (बनावट) कंपन्यांमध्ये वळती केली होती. त्यानंतर ही रक्कम तायल समूहाच्या मुख्यत्वे केएसएल अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला पाठविली होती. समूहाने बँकेतून कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम विविध शहरांमध्ये रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्ये मुख्यत्वे शॉपिंग मॉल आणि निवासी संकुल बांधण्यासाठी वापरल्याचा ईडीला संशय आहे. ईडीने ४८३ कोटी रुपयांच्या एम्प्रेस मॉलची मालमत्ता तात्पुरती जप्त केली असून ही कारवाई गुन्ह्येगारी स्वरूपाची असल्याचे ईडीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पूर्वीही तायल समूहावर कारवाई
ईडीने अशाच फसवणुकीच्या प्रकरणात पूर्वीही तायल समूहाची २३४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती, हे येथे उल्लेखनीय. तायल समूहाच्या कंपन्यांनी युको बँकेकडून २३४ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन तायल समूहाच्या शेल कंपन्यांमध्ये वळते केले होते, असे सूत्रांनी सांगितले.
ईडीला एम्प्रेस मॉलची मालमत्ता जप्त करता येऊ शकते काय?
एम्प्रेस मॉल ही नागपुरातील लोकांना भेट देण्यासाठी एक लोकप्रिय जागा आहे. केएसएल इंडस्ट्रीजने एम्प्रेस मॉलमधील दुकाने व्यावसायिकांना विकली आहेत. मग ही दुकाने ईडीला खरंच जप्त करता येऊ शकतात का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी वरिष्ठ वकील फिरदोस मिर्झा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, केएसएल इंडस्ट्रीजने ही दुकाने विकली असेल तर ईडीला जप्त करता येत नाहीत. जर ही दुकाने लीज वा भाड्याने दिली असेल तर मालकी हक्क केएसएलचाच आहे. ही संपत्ती तात्पुरती जप्त केली असल्यामुळे ईडीच्या परवानगीने दुकाने उघडी ठेवता येऊ शकतात, असे अॅड. मिर्झा यांनी सांगितले.