उद्योजक कुटुंबावर ‘ईडी’ची धाड
By Admin | Published: February 4, 2016 02:45 AM2016-02-04T02:45:15+5:302016-02-04T02:45:15+5:30
केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात शहरातील उद्योजक डागा कुटुंबीयांशी संबधित तीन ठिकाणांवर धाड टाकली.
तीन ठिकाणी कारवाई : आर्थिक अनियमिततेची तपासणी
नागपूर : केंद्र सरकारच्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात शहरातील उद्योजक डागा कुटुंबीयांशी संबधित तीन ठिकाणांवर धाड टाकली. कोळसा खाणीच्या विक्री संबंधात सीबीआय उद्योजक डागा कुटुंबीयांची चौकशी करीत आहे. सूत्रानुसार खाणीच्या विक्रीतून मिळालेला पैसा विविध खात्यांमध्ये वळता केला होता. हा सौदा सीबीआयच्या तपासादरम्यान समोर आला होता. सीबीआयने याचा संपूर्ण अहवाल ईडीला पाठविला. तेव्हापासून ईडी या प्रकरणाची चौकशी करीत आहे
सूत्रानुसार ईडीच्या चौकशीत देवाणघेवाण उघडकीस आली आहे. या आधारावर ईडी अधिकाऱ्यांच्या चमूने बुधवारी सकाळी गोविंद डागा आणि अशोक डागा यांच्या पुनम चेंबर्सस्थित एक ज्वेलरी शोरूम आणि सिव्हील लाईन्स स्थित निवासावर तसेच कार्यालयावर धाड टाकून कारवाई केली.
या कारवाईला सकाळी ६ वाजता सुरुवात करण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांनी गोविंद डागा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची दिवसभर विचारपूस केली.
मिळालेल्या माहितीनुसार डागा कुटुंबीयांनी ४०० कोटी रुपयात खाणीची विक्री केली होती. या रकमेला विविध खात्यात जमा करण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी धाड टाकून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात उद्योजक कुटुंबातील लोकही जुळले असल्याची माहिती मिळाली आहे. ईडी अधिकारी या कारवाईबाबत मात्र माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. (प्रतिनिधी)