‘ईडा पिडा... रोगराई... दुष्ट प्रवृत्ती आणि संकटांना घेऊन जा गे मारबत’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:36 AM2022-08-28T10:36:25+5:302022-08-28T10:36:52+5:30
तब्बल १४२ वर्षांची परंपरा असलेली, विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली मारबत-बडग्याची मिरवणूक दोन वर्षांनंतर शनिवारी उपराजधानी नागपुरात उत्साहात निघाली.
तब्बल १४२ वर्षांची परंपरा असलेली, विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली मारबत-बडग्याची मिरवणूक दोन वर्षांनंतर शनिवारी उपराजधानी नागपुरात उत्साहात निघाली. ‘ईडा पिडा... रोगराई.... दृष्ट प्रवृत्ती आणि संकटांना घेऊन जा गे मारबत’ अशा घोषणा देत मारबत उत्सव साजरा झाला.
तेली समाजाच्या पिवळ्या मारबतीला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही आहे, तर काळी मारबत ही पुतणा मावशीचे प्रतीक मानली जाते. स्वातंत्र्य लढ्यात या मारबतींच्या माध्यमातून देशभक्तीची बीजे रोवण्याचे काम होत होते. जागनाथ बुधवारी येथून निघणारी पिवळी मारबत आणि श्री देवस्थान पंचकमेटी इतवारी येथून निघणारी काळी मारबत यांचे मिलन नेहरू पुतळ्याजवळ झाले. या मिलनाचे विहंगम दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी अख्खे नागपूर नेहरू पुतळ्याजवळ एकवटले होते.
बडग्यांची मिरवणूक, त्यावर विविध संदेश लिहिलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ढोल-ताशा आणि डीजेच्या दणदणाटात तरुणाई थिरकत होती. इतवारीपासून ते बडकस चौकापर्यंत चारही बाजूंनी लोकांची गर्दी दाटली होती. अनेक नागरिक आपल्या कुटुंबीयांसह आणि लहान बालगोपालांना सोबत घेऊन हा अनोखा उत्सव पाहण्यासाठी आले होते.
बडग्यांनी ठेवले अनिष्ट प्रथा, महागाईवर बोट
यंदा एकूण १२ बडगे काढण्यात आले. यात बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, पेट्रोल दरवाढ आणि राजकीय परिस्थितीवर बोट ठेवणाऱ्या बडग्यांचा समावेश होता.