नागपुरात ईडीची सीएच्या कार्यालयावर कारवाई; शहरात उलटसुलट चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 10:58 PM2021-10-28T22:58:44+5:302021-10-28T22:59:14+5:30
Nagpur News सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी नागपुरातील एका कार्यालयावर कारवाई केली. मुंबईहून आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाने सीएच्या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
नागपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी नागपुरातील एका कार्यालयावर कारवाई केली. मुंबईहून आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाने सीएच्या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणताही माहिती न दिल्याने कारवाईबाबत शहरात उलटसुलट चर्चा होती.
सदर येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या इमारतीलगत श्रीराम टॉवर आहे. या टॉवरच्या बी-विंगमधील सहाव्या माळ्यावर सीए वरुण पारख यांचे कार्यालय आहे. सकाळी १०.३० वाजता ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांच्या चमूने कार्यालयात प्रवेश केला. सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते. त्यांनी तपासणी सुरू केली. या कार्यालयाचे मालक माजी आमदार व काँग्रेस नेते आशिष देशमुख आहेत. त्यामुळे दुपारी कारवाईचे वृत्त वेगाने पसरले. त्यानंतर कार्यालयात गर्दी झाली. कार्यालयात चौकशी व तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आत कुणालाही प्रवेश दिला नाही. याची माहिती होताच सदर पोलीस या ठिकाणी पोहोचले, पण त्यांनाही अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती न देता परत पाठविले.
कार्यालयाच्या लेटरबॉक्सवर डॉ. आशिष देशमुख निर्मित रिॲलिटिज प्रा.लि., क्रायओ कॅपिटल प्रा.लि., तक्षशिला शिवपुरी प्रा.लि., ब्लॅकबेरी वाणिज्य प्रा.लि., पीसफुल एजन्सीज प्रा.लि., डहलिया एजन्सीज प्रा.लि. लिहिले होते. ही कारवाई सहकारी बँक घोटाळ्याबाबत करण्यात आल्याची चर्चा आहे. ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये काही शेल कंपन्यांची तपासणी करीत असल्याचे सांगितले जाते. याच शृंखलेत ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूरसह अन्य शहरांतही अशीच कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.