निवडणूक जवळ येईल तसतशा ईडीच्या कारवाया वाढणार; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विधान
By कमलेश वानखेडे | Published: January 24, 2024 04:43 PM2024-01-24T16:43:07+5:302024-01-24T16:45:14+5:30
रोहीत पवार कागदपत्र घेऊन चौकशीला जाणार, असेही अनिल देशमुख म्हणाले.
कमलेश वानखेडे, नागपूर : विरोधकांना केंद्रीय तपास यंत्राणांकडून ठरवून त्रास दिला जात आहे. ईडीच्या चौकशीसाठी रोहीत पवार यांना बोलावले आहे. ते रोहीत पवार कागदपत्र घेऊन चौकशीला जातील. निवडणूक जवळ येईल तसतशा ईडीच्या कारवाया वाढणार आहेत. पण कितीही त्रास दिला तरी आम्ही खंबीर आहोत, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष रोहीत पवार यांच्या पाठीशी आहे. जो कुणी चांगले काम करतो, सरकारच्या विरोधी भुमिका घेतो त्यांच्या विरोधात चौकशी केली जाते. रोहीत पवार यांनी संघर्ष यात्रा चांगली काढली, त्यामुळे त्रास दिला जात आहे. असाच त्रास मला, संजय राऊत, नवाब मलीक यांना दिला जात आहे. चार वर्षांपूर्वी शरद पवार यांना ईडीचा नोटीस पाठवला. पण तेव्हा लाखो लोक रस्त्यावर आले होते. तेव्हा पोलीस आयुक्त सरद पवारांना भेटले. त्यामुळे पवार गेले नाहीत. भाजपच्या एकाही कार्यकर्त्यावर ईडीची कारवाई नाही. फक्त विरोधकांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजपचे आमदार फुटणार : भाजपच्या आमदारात अस्वस्थता जास्त आहे. बाहेरुन आले आणि पहिल्या पंगतीत बसले, असे सुरू आहे. यामुळे भाजप आमदार नाराज आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या वेळेस भाजपचे आमदार फुटणार, असा दावाही देशमुख यांनी केला.