देशातील शिक्षण व आरोग्य क्षेत्र सुदृढ व्हावे : गुलाम नबी आझाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 10:27 AM2022-05-05T10:27:41+5:302022-05-05T10:30:49+5:30

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस् - २०२१’चे बुधवारी नागपुरात थाटात वितरण झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.

Education and health sector in the country should be strengthened: ghulam nabi azad | देशातील शिक्षण व आरोग्य क्षेत्र सुदृढ व्हावे : गुलाम नबी आझाद

देशातील शिक्षण व आरोग्य क्षेत्र सुदृढ व्हावे : गुलाम नबी आझाद

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस् - २०२१’चे थाटात वितरण

नागपूर : भारतातील डॉक्टर्स अमेरिका व ब्रिटनपेक्षा जास्त ज्ञानी व कुशल आहेत. बाहेरील देशदेखील हे मान्य करतात. भारतीय लोकांमध्ये प्रचंड क्षमता असली तरी शिक्षण व आरोग्य क्षेत्रावर अधिक भर द्यायला हवा, या दोन्ही क्षेत्रांना सुदृढ करण्याची आवश्यकता आहे, असे माजी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस् - २०२१’चे बुधवारी नागपुरात थाटात वितरण झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.

हॉटेल सेंटर पॉईंट येथे झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, खा. डॉ. विकास महात्मे, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, मुंबईतील प्रसिद्ध फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. प्रतीत समदानी, ज्युरी बोर्डाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ फिजिशियन डॉ. एस. एन. देशमुख, सचिव आणि ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. राजू खंडेलवाल प्रामुख्याने उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व खूप मोठे असून, लोक डॉक्टरांना देवदूत मानतात. अमेरिका, ब्रिटनसारखे देश चांगल्या डॉक्टर्ससाठी भारतावर अवलंबून असतात ही वस्तुस्थिती आहे. आरोग्यमंत्रीपदाच्या माझ्या कार्यकाळातील निर्णयांमुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचा विस्तार होऊ शकला व महाविद्यालयांना चांगले प्राध्यापकदेखील मिळू शकले याचे समाधान आहे. २०३० पर्यंत कर्करोग, मधुमेह या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असेल. हीच बाब लक्षात घेऊन देशात ७१ कर्करोग रुग्णालयांची स्थापना करण्यात आली होती. तर प्रत्येक नागरिकाच्या मधुमेह चाचणीचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र सत्ताबदल झाल्याने तो प्रकल्प थंडबस्त्यात गेला. भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात केमोथेरपीची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. तसेच अगदी कामगार वर्गापासून देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्व जण ‘फिट’ कसे राहतील यावर भर दिला गेला पाहिजे, असे गुलाम नबी आझाद म्हणाले. श्वेता शेलगांवकर यांनी सूत्रसंचालन केले.

बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार हे ‘टाईमबॉम्ब’सारखे : फडणवीस

कोरोनानंतर देशाला वैद्यकीय क्षेत्र व सुविधांचे महत्त्व लक्षात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांबाबत समाजात आदरदेखील वाढला आहे. आपल्या देशाने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. मात्र तरीदेखील आरोग्य क्षेत्रात आणखी सुधारणा झाल्या पाहिजेत. आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूकदेखील वाढली पाहिजे, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘लाईफस्टाईल’मुळे होणारे आजार हे ‘टाईमबॉम्ब’सारखे असून, भारत त्यासंदर्भात मोठे केंद्रच बनत आहे. या दिशेनेदेखील काम झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

पैसा नव्हे, उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती : राऊत

कोरोना काळात वैद्यकीय तज्ज्ञ, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी हे देवासारखे धावून आले होते. कोरोनात अनेकांनी जवळचे लोक गमावले व दुसरीकडे या आजाराने नव्या उमेदीने जगण्याचेदेखील बळ दिले. आहार व व्यायाम ही काळाची गरज झाली आहे. आज पैसा नव्हेतर, उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती मानली पाहिजे, असे मत नितीन राऊत यांनी व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रातील मोठ्या संस्था नागपुरात आल्या. शिक्षणाप्रमाणे नागपूर आता ‘मेडिकल हब’देखील होत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांना सन्मानित करण्यासाठी ‘लोकमत’ समूहाने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

 

हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या संस्था का नाहीत?

‘लोकमत’ने वैद्यकीय तज्ज्ञांना सन्मानित करत एक सकारात्मक पायंडा पाडला आहे. आरोग्य क्षेत्राला आता समाजाने गंभीरतेने घेण्याची गरज आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या अनेक संस्था आहेत, मात्र हॉस्पिटल मॅनेजमेंटचे धडे देणाऱ्या संस्था का नाहीत, असा सवाल डॉ. विकास महात्मे यांनी उपस्थित केला.

ग्रामीण भागातील रुग्णालये विकसित व्हावीत

रुग्णांची सेवा करणे हा व्यवसाय नसून एक विधायक क्षेत्र आहे. माणुसकी व सेवेचा पाया मजबूत करण्याचे कार्य वैद्यकीय तज्ज्ञ करतात व समाजात सकारात्मक प्रकाश पसरवितात. असे असले तरी आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्याच्या अनेक संधी आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये पायाभूत सविधा, यंत्रसामग्री यांचा अभाव आहे. ग्रामीण भागातील रुग्णालये विकसित करणे अत्यावश्यक आहे, अशी भूमिका विजय दर्डा यांनी मांडली. कोरोना काळात ‘लोकमत’ने ‘रक्ताचं नातं’ अभियानाच्या माध्यमातून लोकसेवेचा वसा जपला व राज्यभरातून ६० हजार बाटल्या रक्त संकलित केले, असे सांगत ‘लोकमत’ने आजवर सर्वांना समान स्थान दिले व त्यामुळे सर्वांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण होऊ शकले, असे ते म्हणाले.

Web Title: Education and health sector in the country should be strengthened: ghulam nabi azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.