शिक्षण विभागाला पडला चाचा नेहरूंचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:25 AM2018-11-14T10:25:58+5:302018-11-14T10:27:06+5:30
बालक दिनानिमित्त देशभरातील लहान मुलांकडून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेरणेचा जागर करण्यात येईल. मात्र शिक्षण विभागाला बहुतेक चाचा नेहरू यांचा विसर पडला आहे.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालक दिनानिमित्त देशभरातील लहान मुलांकडून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेरणेचा जागर करण्यात येईल. मात्र शिक्षण विभागाला बहुतेक चाचा नेहरू यांचा विसर पडला आहे. विभागातर्फे शाळा-महाविद्यालयांना बालक दिन साजरा करण्यासंदर्भात कुठलेही दिशानिर्देश देण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे महापुरुष किंवा महत्त्वाच्या व्यक्तींच्या जयंती साजरी करण्यासंदर्भात नियमितपणे दिशानिर्देश देण्यात येतात. हा प्रकार अनवधानाने झाला आहे की यामागे अन्य काही कारण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण विभागाने शाळा-महाविद्यालयांसोबत विद्यापीठालादेखील कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळेच शाळा, महाविद्यालयेच नाही तर सरकारी कार्यालयांमध्येदेखील कुठलीही तयारी दिसून आली नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ व कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात केवळ नेहरूंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्याइतपतच कार्यक्रम मर्यादित असेल. माल्यार्पण कोणाच्या हस्ते करण्यात येईल याचादेखील उल्लेख करण्यात आलेला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागात लागलेल्या एका यादीनुसार पंडित नेहरू यांच्या प्रतिमेवर केवळ माल्यार्पण करण्यात येणार आहे. कुठल्याही महापुरुष किंवा महत्त्वाच्या व्यक्तीची जयंती किंवा पुण्यतिथीनिमित्त कशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करावे, याबाबत शिक्षण विभागातर्फे १० दिवसअगोदर सूचना जारी करण्यात येते. यानुसारच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासंदर्भात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी ठोस उत्तर दिले नाही.