दहा राज्यांमध्ये अभियांत्रिकीचे मातृभाषेतून शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 10:17 PM2021-12-17T22:17:02+5:302021-12-17T22:17:25+5:30
Nagpur News देशात मराठीसह इतर पाच भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जात आहे. दहा राज्यांमधील १९ महाविद्यालयांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन ‘एआयसीटीई’चे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले.
नागपूर : . राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषेतून उच्चशिक्षणावर भर देण्यात आला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण केवळ इंग्रजीतूनच द्यावे, असा कुठेही उल्लेख नाही. परंतु तशी परंपराच चालली. मात्र आता स्थिती बदलते आहे. देशात मराठीसह इतर पाच भाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जात आहे. दहा राज्यांमधील १९ महाविद्यालयांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन ‘एआयसीटीई’चे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित चर्चासत्रासाठी ते नागपुरात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
मराठीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याचा प्रयोग पिंपरी-चिंचवडमधील एका महाविद्यालयाने सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य मातृभाषेत उपलब्ध होत नसल्याची अडचण असते. त्यामुळे आता एआयसीटीई स्वत: विविध भाषांमध्ये अभ्यासाचे साहित्य तयार करण्यावर जोर देत असून, सहा भाषांमधील पुस्तके तयार झाली आहेत. यात तेलगू, तामीळ, कन्नड, मराठी, हिंदी आणि बांगला या भाषांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आवश्यकतेपेक्षा जास्त अभियांत्रिकी महाविद्यालये असल्याने, अनेक ठिकाणी जागा रिक्त राहत होत्या. त्यामुळे मागील दोन वर्षे एकाही नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी देण्यात आली नाही. पुढील दोन वर्षेदेखील परवानगी देण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ‘एआयसीटीई’चे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे हे देखील उपस्थित होते.
अभियांत्रिकीसाठी भारतीय पारंपरिक ज्ञानावर पुस्तक
अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात भारतीय पारंपरिक ज्ञानदेखील समाविष्ट झाले पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे एका ठिकाणी असावे व त्या माध्यमातून क्रेडिट आधारित अभ्यासक्रम सुरू करता यावा, यासाठी पुस्तक तयार करण्यात येत असल्याचे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
उच्च शिक्षणातील नोंदणी प्रमाण ५० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट
येणाऱ्या पाच वर्षांत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २७ टक्क्यापासून ते ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ‘एआयसीटीई’ने ठेवले आहे. याशिवाय अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांसाठी विशिष्ट अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, तो पूर्ण केल्याशिवाय त्यांना नियमित होता येणार नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.
परीक्षा पद्धतीत प्रात्यक्षिक ज्ञानावर भर हवा
विद्यापीठांच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदलांची गरज आहे. तीन तासात विद्यार्थ्यांनी पाठांतर केलेल्या उत्तरांवर त्यांचे मूल्यमापन होऊ शकत नाही. त्यामुळे प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देत त्या अनुषंगाने परीक्षा पद्धतीत बदल व्हायला हवा, असे मत डॉ. सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.