प्राथमिक शिक्षण विभागातील तंबाखू, खर्रा खाणाऱ्यांची झाडाझडती, शिक्षणाधिकाऱ्यांची तंबी
By गणेश हुड | Published: May 31, 2023 03:22 PM2023-05-31T15:22:06+5:302023-05-31T15:27:46+5:30
व्यसनमुक्तीचा दिला सल्ला
नागपूर : शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात तंबाखू व खर्रा खाणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची कमी नाही. जिल्हा परिषदेच्याशिक्षण विभागात खर्रा-तंबाखुसारख्या पदार्थांचे व्यसन तर नाही ना? असले तर जनजागृती सोबतच संबंधित कर्मचाऱ्यांना कारवाईची तंबी देण्याचा उपक्रम गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी सुरु केला आहे. अचाकन संपूर्ण विभागाची झाडाझडती घेत असल्याने तंबाखू व खर्रा खाणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी सुमारे ८ लाख लोक दगावतात. मधुमेहाचा धोकादेखील वाढतो. यासर्व बाबी लक्षात घेता कुंभार यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचारी हे खर्रा व इतर तंबाखुजन्य पदार्थाच्या व्यसनी राहू नये, यासाठी त्यांनी कुठल्याही वेळी आपल्या अधिनस्त विभागांमध्ये भेटी देणे सुरु केले आहे. या भेटीदरम्यान जनजागृती करण्यासोबतच अशा पदार्थांचे सेवन करताना आढणाऱ्यांवर प्रसंगी कारवाईही करत आहेत.
विभागांमध्ये भेटी देऊन कर्मचारी आपल्या कार्यासनाच्या ठिकाणी आहेत किंवा नाही, याची पाहणी करत आहेत. सोबतच कर्मचाऱ्यांना कार्यालय आपले घर समजून आपल्या कार्यासनाच्या परिसरासोबतच कार्यालयात स्वच्छता राखण्यासोबत, अभिलेखे बरोबर ठेवण्याचा सल्ला देत आहेत. कुंभार यांनी समग्र, खासगी माध्यम, आस्थापना विभाग, विस्तार अधिकारी कक्षाला भेटी दिल्या. यावेळी एक कर्मचारी खर्रा खाऊन आढळला. त्याला तंबी दिली. असा प्रकार पुन्हा आढळल्यास कारवाईचा इशारा दिला.