शिक्षण एका शाळेत, टीसी दुसऱ्या शाळेचा, युडायस नंबर तिसऱ्याच शाळेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:25 AM2020-12-13T04:25:02+5:302020-12-13T04:25:02+5:30
मंगेश व्यवहारे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आधुनिक शिक्षणाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये वसूल करणाऱ्या एका शाळेचा बनावटपणा उघडकीस ...
मंगेश व्यवहारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधुनिक शिक्षणाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये वसूल करणाऱ्या एका शाळेचा बनावटपणा उघडकीस आला आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकाने शाळा सोडण्याचा दाखला (टीसी) मागितला असता त्याला दुसऱ्याच शाळेचा टीसी दिला. त्यावर दाखल असलेला यु-डायस नंबर हा तिसऱ्याच शाळेचा आहे. त्यामुळे एक विद्यार्थी तीन शाळेत कसा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या शाळेत ९०० विद्यार्थी असल्याची माहिती आहे. म्हणजेच या शाळेने हा बोगसपणा करून या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.
ही नामांकित शाळा वाठोडा येथील नारायणा ई-टेक्नो स्कूल आहे. २०१९-२० या सत्रात शाळा सुरू झाली. नर्सरी ते सातवीपर्यंत ९०० विद्यार्थी येथे प्रवेशित असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे शाळेने आधुनिक आणि स्मार्ट शिक्षणाचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांचे प्रवेश करवून घेतले होते. याच शाळेत तिसऱ्या वर्गात निर्मित प्रशांत चकोले हा विद्यार्थी शिकत होता. शाळेतील अध्यापनाची पद्धती व मुलाची शैक्षणिक प्रगती समाधानकारक नसल्याने पालक प्रशांत चकोले यांनी जून महिन्यात महिन्यात शाळा सोडण्याचा दाखला मिळविण्यासाठी अर्ज केला. वेगवेगळे कारणे देऊन त्यांना सुरुवातीला टाळण्यात आले. पण प्रशांत चकोले यांनी खंबीर भूमिका घेतल्याने सहा महिन्यानंतर त्यांना शाळा सोडण्याचा दाखला देण्यात आला.
नारायणा ई-टेक्नो या शाळेने पालकाला दिलेला शाळा सोडण्याचा दाखला हा किड्स प्ले स्कूल इंग्लिश प्रायमरी दाभा, नागपूर या शाळेचा दिला. पण या दाखल्यावर शाळेचा जो युडायस नंबर दिलेला आहे. तो झोया एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या यशवंत इंग्लिश स्कूल दाभा या शाळेचा असल्याचे राज्य शासनाच्या युडायस पोर्टलवरून निदर्शनास येते. शाळेने केलेल्या या बोगसपणामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश अडचणीत आलेला आहे. ज्या शाळेचा टीसी दिला तिथे विद्यार्थ्याची नोंद नाही, जो युडायस नंबर दिला, त्यावरही विद्यार्थ्याची नोंद नाही.
शिक्षण तज्ञांच्या मते ज्या शाळेला युडायस नंबर नाही, त्या शाळेला शासनाची मान्यता नाही. त्यामुळे शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवर नोंद होऊ शकत नाही. म्हणजेच येथे शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे अवैध आहे.
- वाठोडा येथील नारायणा ई-टेक्नो या शाळेत माझा मुलगा तिसऱ्या वर्गात शिकला. मला शाळेची अध्यापन पद्धती व शैक्षणिक प्रगती समाधानकारक वाटली नाही. त्यामुळे शाळा सोडण्याचा दाखला मागितला. पण दाखला दुसऱ्याच शाळेचा दिला. मी ६५ हजार रुपये शाळेचे शैक्षणिक शुल्क भरले. माझ्याशी शाळेने केलेल्या फसवणुकीसंदर्भात वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो, पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. शिक्षण विभागाकडून आम्हाला फोन आल्यावर कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.
प्रशांत चकोले, पालक
-बोगसपणा आहेच, चौकशी करू
शाळेने हा बोगसपणा केलेला आहे. पण तरीही आम्ही योग्य ती शहनिशा करून चौकशी करू.
चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प.
- फेब्रुवारी महिन्यात युडायस नंबर मिळेल
यासंदर्भात शाळेच्या प्राचार्य डॉ. सुलक्षणा भुयार यांच्याशी संपर्क केला असता, त्या म्हणाल्या आम्ही ज्या शाळेचा टीसी दिलेला आहे. त्या शाळेसोबत आमचा टायअप झालेला आहे. ज्या शाळेचा युडायस नंबर दिलेला आहे. त्या शाळेत विद्यार्थ्यांचे सरल पोर्टलमध्ये नाव नोंदविलेले आहे. आम्हाला फेब्रुवारी महिन्यात युडायस नंबर मिळणार आहे. माझा संबंध फक्त अॅकेडेमिकशी आहे.