नागपुरात शिक्षण सचिव नंदकुमारचा शिक्षकांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:24 AM2018-01-10T00:24:03+5:302018-01-10T00:25:06+5:30
शाळा बंदच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी व औरंगाबादच्या बैठकीत राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भाषा करणाऱ्या राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांचा निषेध शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आला. शिक्षकांनी काळ्या फिती लावून अध्यापनाचे कार्य केले. त्याचबरोबर नंदकुमार यांना हटविण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शाळा बंदच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी व औरंगाबादच्या बैठकीत राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भाषा करणाऱ्या राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांचा निषेध शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आला. शिक्षकांनी काळ्या फिती लावून अध्यापनाचे कार्य केले. त्याचबरोबर नंदकुमार यांना हटविण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.
शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण सचिवाने टप्प्याटप्प्याने राज्यातील ८० हजार शाळा बंद प्लॅन बैठकीत जाहीर केला. शिक्षक भारतीने त्याचा कडाडून विरोध केला असून, राज्यातील एकही शाळा बंद होऊ देणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. या आंदोलनात राजेंद्र झाडे, दिलीप तडस, भाऊराव पत्रे, संजय खेडीकर, सपन नेहरोत्रा, भारत रेहपाडे, दीपक नागपुरे, अविनाश कोकाटे, प्रकाश रंगारी, चक्रधर ठवकर आदी सहभागी झाले होते.
शिक्षक सेनेची उपसंचालकांशी बैठक
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या नावाखाली शिक्षक व शिक्षण संस्थांना वेठीस धरल्या जात आहे. शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा लादून ज्ञानदानापासून वंचित ठेवल्या जात आहे. अतिरिक्त शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न, समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर, माजी खासदार प्रकाश जाधव, सचिव रमेशबाबू वंजारी यांच्या उपस्थितीत शिक्षक उपसंचालक अनिल पारधी यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.