राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट, सरकारला धारेवर धरणार ; आ. पाटील, आ. सावंत व आ. देशपांडे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:25 PM2017-12-11T22:25:06+5:302017-12-11T22:25:26+5:30
राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट असून शिक्षकांना आॅनलाईन कामांना जुंपले आहे. १३ हजार शाळा पटसंख्येचे कारण देऊन बंद पाडल्या आहेत.चर्चेदरम्यान सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती आ. कपिल पाटील, आ. दत्तात्रय सावंत आणि आ. श्रीकांत देशपांडे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट असून शिक्षकांना आॅनलाईन कामांना जुंपले आहे. १३ हजार शाळा पटसंख्येचे कारण देऊन बंद पाडल्या आहेत. यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी विधान परिषद नियम २६० अन्वये प्रस्ताव मांडण्यासाठी विधान परिषद सभापतींकडे परवानगी मागितली आहे. चर्चेदरम्यान सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती आ. कपिल पाटील, आ. दत्तात्रय सावंत आणि आ. श्रीकांत देशपांडे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.
सरकारने ‘कायम’ हा शब्द कायमचा काढला आहे. १० वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांना एक मिनिट उशीर झाला तरी परीक्षेला बसू न देण्याचा जुलुमी निर्णय बोर्डाने घेणे, अंतर्गत मूल्यमापनाचे २० टक्के गुण रद्द करून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात टाकणे, शाळा बंद झाल्यामुळे २ लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात येणे, राज्यातील ४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य असणे, शिक्षण हक्क कायद्याची उघड उघड पायमल्ली होणे, राज्यातील १७६ रात्रशाळा १७ मे २०१७ च्या निर्णयाचा परिणाम म्हणून बंद पाडणे, १०१० शिक्षक तर ३४८ शिक्षकेतर कर्मचाºयांच्या सेवा तात्काळ समाप्त करणे, ज्युनिअर कॉलेज शिक्षकांना वेतन नाकारणे आदी आरोप आमदारांनी केले.
शिक्षणाच्या चिंताग्रस्त परिस्थितीची शासनाने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी त्यांनी आमदारांनी केली.