बोंडअळीचा परिणाम : नागपूर जिल्ह्यात कापसाच्या पेऱ्यात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:41 PM2018-06-02T21:41:07+5:302018-06-02T21:41:58+5:30
गेल्या वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेला परिणाम लक्षात घेता, यंदा कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट किमान २ हजार हेक्टरपर्यंत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेला परिणाम लक्षात घेता, यंदा कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट किमान २ हजार हेक्टरपर्यंत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे.
कृषी विभागाचा कापसाच्या लागवडीत घट झाल्याचा अंदाज असला तरी, सर्वाधिक क्षेत्र हे कापूस पिकाने व्यापले आहे. जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर कापसाचे लागवडीचे क्षेत्र राहणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर आहे. यंदा खरीपासाठी ८६,२०४ क्विंटल बियाणे लागणार आहे. कापसाच्या खालोखाल सोयाबीन लागवडीचे क्षेत्र राहणार आहे. सोयाबीनचा पेरा १ लाख हेक्टरवर होणार आहे. भाताचा पेरा ९४,२०० हेक्टरवर राहणार आहे. तुरीची ६५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात येणार आहे. संकरित ज्वारीची लागवड यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे ८ हजार हेक्टर इतकी राहणार आहे. मका ५ हजार हेक्टर, तीळ ३०० हेक्टर, उडीद, मूंग प्रत्येकी १५०० हेक्टर, ऊस ५ हजार हेक्टर, एरंडी ३०० व इतर कडधान्य ३०० हेक्टर राहणार आहे.
२६ हजार ५४२ क्विंटल बियाण्यांची मागणी
विदर्भात कापसाचा पेरा सर्वाधिक असतो. जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी होणार आहे. त्यासाठी बीटी कापसाचे बियाणे ४५०० क्विंटल लागणार आहे. विभागाकडून यंदा महाबीजकडे २६ हजार ५४२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे, सोबतच कृषी सेवा केंद्रातही मुबलक बियाणे उपलब्ध आहे.
कृषी विभागाकडून मार्गदर्शन
गेल्या वर्षीप्रमाणे यंदा कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावागावात सभेच्या माध्यमातून कृषी सहायक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत, सोबतच बियाण्यांचे सॅम्पलिंग काढणेही सुरू आहे. सध्या शेतकऱ्यांकडून नांगरणीचे काम सुरू आहे. चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, सोबतच घरचे व कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची प्रथम उगवणक्षमता तपासून पाहावी. बियाण्यांची बीज प्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्यांची खरेदी करू नये, जेथून बिल उपलब्ध होईल, तेथूनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा कृषी कार्यालयाकडून करण्यात येत आहे.