व्यंगचित्र बातम्यांपेक्षाही परिणामकारक

By admin | Published: May 9, 2016 02:51 AM2016-05-09T02:51:25+5:302016-05-09T02:51:25+5:30

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत लक्ष्मणरेषा व्यंगचित्र प्रदर्शन : विजेते व्यंगचित्रकार पुरस्कृत

Effective than cartoon news | व्यंगचित्र बातम्यांपेक्षाही परिणामकारक

व्यंगचित्र बातम्यांपेक्षाही परिणामकारक

Next

नागपूर : व्यंगचित्रांच्या माध्यमातून आतापर्यंत महत्त्वाचा संदेश आणि समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न संपूर्ण जगभरात झाला. एखाद्या घटनेवर परिणामकारक भाष्य करण्याची शक्ती एका व्यंगचित्रात असते. कदाचित संपूर्ण वृत्तपत्रातील बातम्यांपेक्षाही व्यंगचित्र अधिक परिणामकारक असू शकते. त्यामुळेच व्यंगचित्रे समाजाचा आरसा आहेत. वेळोवेळी प्रचलित व्यवस्थेत निर्माण होणारे दोष, उणिवा व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात येतात आणि जनमत तयार होते. यातूनच व्यवस्थांमध्ये सकारात्मक बदल होतात आणि अनेक प्रश्नांकडे जनतेचे, राजकीय व्यवस्थेचे लक्ष जाते. त्यामुळे व्यंगचित्र हे प्रभावी आणि परिणामकारक माध्यम आहे, असे मत लोकमतच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘लक्ष्मणरेषा’ या व्यंगचित्रांच्या प्रदर्शन समारोपप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.

हे प्रदर्शन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, रामदासपेठ येथे ४ मे पासून आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचा समारोप रविवारी ८ मे रोजी गॅलरीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, मुख्य अतिथी माजी खा. बनवारीलाल पुरोहित, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू गिरीश्वर मिश्र, व्हीडीएनएचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक उपस्थित होते. याप्रसंगी व्यावसायिक आणि नवोदित व्यंगचित्रकारांचे दोन गट करण्यात आले होते.
यात प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके अतिथींच्या हस्ते विजेत्या व्यंगचित्रकारांना प्रदान करण्यात आलीत. जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त लोकमत समूहाने पुढाकार घेत हे प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजित केली. व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन मिळावे आणि चांगले व्यंगचित्रकार निर्माण व्हावे, हा प्रदर्शनाचा उद्देश होता. या प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनात देशातील नामांकित वृत्तपत्रांचे आणि राष्ट्रीय स्तरावर ख्यातिप्राप्त मुक्त व्यंगचित्रकारांनी लक्षणीय सहभाग घेतला. याशिवाय नवोदितांच्या व्यंगचित्रांनाही प्रदर्शनात संधी देण्यात आली.
कार्यक्रमात सर्वच अतिथींनी लोकमतच्या या उपक्रमाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. लोकमतने घेतलेला हा पुढाकार भविष्यातील चांगल्या व्यंगचित्रकारांना समोर आणणारा आहे. सध्या व्यंगचित्रकारांची कमतरता असताना लोकमतच्या या उपक्रमाने अधिक चांगले व्यंगचित्रकार तयार होतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. या प्रदर्शनासाठी लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान यांच्या मार्गदर्शनात दर्डा आर्ट गॅलरीचे समन्वयक अमित गोनाडे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

सामाजिक कार्यासाठी व्यावसायिक स्पर्धा नसावी : विजय दर्डा
वृत्तपत्रांनी रचनात्मक सामाजिक कार्यासाठी परस्परांशी व्यावसायिक स्पर्धा टाळायला हवी. वृत्तपत्रे समाजाला मार्गदर्शन करीत असतात. निकोप समाज निर्माण करणे आणि जनप्रबोधन करणे, हे वृत्तपत्रांचे काम आहे, असे श्रद्धेय बाबूजींचे मत होते. वाचकांचा विश्वास जिंकण्यासाठी वृत्तपत्रांची ही सामाजिक बांधिलकी हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळेच जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त लोकमतने जगातील सर्व वृत्तपत्रांच्या व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे आमंत्रित केली. भोपाळला लोकमत भवनचे लोकार्पण करताना दिग्विजयसिंग, दैनिक भास्करचे सर्वेसर्वा सुधीर अग्रवाल यांना एकत्र आणले होते. वृत्तपत्रांची स्पर्धा बातम्यांशी असते व्यक्तींशी नव्हे. या प्रदर्शनाच्या समारोपालाही सर्व संपादकांना आमंत्रित करण्यात आले आहे. पूर्वी व्यंगचित्रकारांच्या भरवशावर वृत्तपत्र चालायचे. पण अशा व्यंगचित्रकारांचा उत्तरार्ध वाईट स्थितीत गेल्याचीही काही उदाहरणे आहेत. आपण त्यांना लोकमतच्या मदतीने मदतही केली. अशी स्थिती मात्र चित्रकार, लेखक, कवी, कलावंत आणि पत्रकारांची होऊ नये, असे मत यावेळी विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

समाजाला अभिरुचीसंपन्न करण्याचा हा प्रयत्न : गिरीश्वर मिश्र
लोकमतचा हा उपक्रम म्हणजे अभिरुचीहीन होत चाललेल्या समाजाला अभिरुचीसंपन्न करणारा आहे. लोकमतचा हा उपक्रम प्रशंसेला पात्र आहे. कलेचा प्रकाश सामान्य माणसांना परस्परांशी जोडतो. त्यात निरंतरता राहिली तर समाजाचे एकत्रिकरण होते. हे सातत्य राखण्यासाठी व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम महत्त्वाचा आहे.

व्यंगचित्रकार होण्यासाठी तपस्या लागते : प्रमोदबाबू रामटेके
व्यंगचित्रकार होणे सहज सोपे नाही. त्यासाठी तपस्या लागते. मी अजूनही विद्यार्थीच आहे आणि खूप काही करायचे आहे. शाश्वत आणि चिरंतन टिकणारी कलाकृती आपल्या हातून निर्माण व्हायला हवी. वॉल्ट डिस्ने, मोरियो यांची तपस्या होती म्हणून त्यांच्या कलाकृती अव्वल ठरल्या. त्यात व्यंगचित्रकारांवर मोठी जबाबदारी असते. समाजाचे प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी करावे. त्यासाठी सातत्य आणि प्रयत्न हीच साधना हवी. लोकमतच्या या उपक्रमाने चांगले व्यंगचित्रकार निर्माण होतील. शुभेच्छा.

लोकमतने महाराष्ट्राबाहेर पाऊल ठेवावे : श्रीकृष्ण चांडक
लोकमतच्या प्रारंभापासून आपण लोकमतचा प्रवास पाहतो आहे. आज लोकमत वटवृक्ष झाले आहे. एका महत्त्वाच्या वृत्तपत्राने घेतलेला हा उपक्रम व्यंगचित्रकार निर्माण करील, यात शंका नाही. कलेच्या माध्यमातून समाज परिवर्तन आणि प्रबोधन शक्य आहे. आता लोकमतने महाराष्ट्राबाहेरही पाऊल ठेवावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव अतुल कोटेचा, सकल जैन समाजाचे निखिल कुसुमगर, अनिल पारख, भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थरक्षिणी कमिटीचे महामंत्री संतोष जैन पेंढारी, व्यावसायिक नरेश पाटणी, रणजितसिंह बघेल, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग, लोकमतचे वित्त नियंत्रक मोहन जोशी, सहायक उपाध्यक्ष संजय खरे, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत टाइम्सचे संपादक एन. के. नायक, लोकमतचे सहसंपादक गजानन जानभोर, लोकमत समाचारचे निवासी संपादक हर्षवर्धन आर्य, मुख्य वार्ताहर कमल शर्मा, महाव्यवस्थापक (रेस) संतोष चिपडा, उपमहाव्यवस्थापक आशिष जैन, वरिष्ठ व्यवस्थापक (रेस) मुश्ताक शेख आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Web Title: Effective than cartoon news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.