पेशींच्या अभ्यासाने प्रभावी उपचार शक्य : विभा दत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 09:52 PM2020-02-06T21:52:02+5:302020-02-06T21:56:47+5:30
पेशींचा अभ्यास केल्यास संबंधित रोगावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. कर्करोग व क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते, अशी माहिती एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेशींचा अभ्यास केल्यास संबंधित रोगावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. कर्करोग व क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते, अशी माहिती एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने (एम्स) राज्यस्तरीय ‘सायटोलॉजी’वर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या.
डॉ. दत्ता म्हणाल्या, मिहान परिसरातील ‘एम्स’मध्ये ८ व ९ फेब्रुवारी रोजी ही परिषद होईल. यात ३००हून अधिक पॅथालॉजिस्ट सहभागी होतील. पहिल्या दिवशी परिषदेचे उद्घाटन ‘वायने स्टेट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन’ आणि अमेरिकेच्या डेट्रॉईट मेडिकल सेंटरचे प्रमुख डॉ. विनोद सीडम यांच्या हस्ते होईल. यावेळी त्यांच्या आई सुनंदा बी सीडम यांच्या स्मरणार्थ ‘सीएमई’ आयोजित केले जाईल. ज्यामध्ये अशा पेशी, ज्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे अवघड असते, यावर सायटोलॉजी तज्ज्ञ आपले अनुभव मांडतील. दुसरी कार्यशाळा ‘सर्व्हयाकल सायटोलॉजी’वर असेल. यात एएफएमसीचे डॉ. जसविंदर भाटिया मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी ९ फेब्रुवारी रोजी परिषदेचे उद्घाटन खा. विकास महात्मे करतील. पॅथॉलॉजीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. शोभा ग्रोव्हरच्या सन्मानार्थ ही परिषद असेल. परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. रसिका गडकरी, डॉ. निशा मेश्राम यांच्यासह डॉ. फातिमा कमल, डॉ किशोर देशपांडे, डॉ. मनजित कौर राजपूत हे परिश्रम घेत आहेत.