उपराजधानीतील सफाई कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ४५ टक्केच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 10:54 AM2017-11-23T10:54:10+5:302017-11-23T10:57:22+5:30
उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु महापालिकेतील सफाई कर्मचारी कार्यक्षमतेच्या ४५ टक्केच काम करतात. त्यांची कार्यक्षमता ५५ टक्के कमी असल्याचा धक्कादायक प्रकार एका सर्वेक्षणात निदर्शनास आला आहे.
गणेश हूड।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. यात शहरातील स्वच्छता हा घटक महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थातच यामुळे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. परंतु महापालिकेतील सफाई कर्मचारी कार्यक्षमतेच्या ४५ टक्केच काम करतात. त्यांची कार्यक्षमता ५५ टक्के कमी असल्याचा धक्कादायक प्रकार एका सर्वेक्षणात निदर्शनास आला आहे.
सफाई कर्मचारी काम करीत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी असल्याने आसीनगर झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जीपीएस घड्याळांच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांचा कामाचा सर्वे करण्यात आला. यात ९ सफाई कर्मचाऱ्यांचा १२ दिवसाच्या कामकाजाचा डाटा कलेक्ट करण्यात आला. त्यानुसार त्यांनी सरासरी ४५ टक्के काम केल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच अपेक्षित कार्यक्षमतेनुसार काम केलेले नाही. प्र्रत्येक कर्मचाऱ्याने दररोज ८ तास काम करणे अपेक्षित आहे. त्यानुसार १२ दिवसात ९६ तास काम करणे अपेक्षित होते.मात्र कामाच्या तासांची सरासरी ४५ टक्केच आहे. एका सफाई कर्मचाऱ्याने फक्त २.६३ तास काम केले आहे. एकाने सर्वाधिक ७२.३५ तास काम केले आहे. इतर ७ कर्मचाºयांनी ३८.९९, २८.५३, ५५.९३, ६८.५७, ३९.३२, २६.३७ व ५८.५६ तास काम केल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर ६४९० सफाई कर्मचारी आहेत. यातील ४९० कर्मचारी महापालिकेच्या इतर विभागात कार्यरत आहेत. म्हणजे ६००० सफाई कर्मचारी विभागात कार्यरत आहेत. ९ कर्मचाऱ्यांच्या १२ दिवसाच्या कामकाजाचा विचार करता प्रत्यक्षात २७०० कर्मचाऱ्यांचेच काम करण्यात आले. म्हणजेच ३३०० कर्मचाºयांनी काम केले नाही. याचाअर्थ सरसकट सर्वच कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत असा होत नाही. काही ८ तास काम करणारेही सफाई कर्मचारी आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी दररोज ८ तास काम करणे अपेक्षित आहे.
आसीनगरचा प्रयोग शहरात राबवावा
प्रभागातील कचरा उचलला जात नाही, रस्त्यांची साफसफाई होत नाही, सफाई कर्मचारी कमी आहेत, अशी नगरसेवकांची तक्रार असते. वस्त्यातील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई केली जात नाही, अशी नागरिकांची तक्रार असते. त्यामुळे आसीनगरच्या धर्तीवर महापालिका सेवेतील सर्वच सफाई कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळी दिल्यातर कर्मचाऱ्यांना दिलेले साफसफाईची जबाबदारी कार्यक्षमतेने करतील. नागरिक ांच्या तक्रारी येणार नाहीत. त्यामुळे हा प्रयोग शहरात राबविण्यात यावा.अशी नागरिकांची मागणी आहे.